esakal | 1996ची चूक 2021मध्ये सुधारली; शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार; पशुचिकित्सालयांच्या वेळेत बदल
sakal

बोलून बातमी शोधा

Changes in veterinary time for farmers in Yavatmal

पशुवैद्यकीय दवाखाने हे पशुसंवर्धन विभागाच्या आदेशानुसार दररोज दोन सत्रात सुरू राहत होते. ही वेळ पशुपालकांच्यादृष्टीने अतिशय गैरसोयीची होती. त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, या मागणीसाठी विविध संघटना, ग्रामपंचायतीकडून निवेदने, विनंती अर्ज संबंधित विभागाला देण्यात आली होती.

1996ची चूक 2021मध्ये सुधारली; शेतकऱ्यांची गैरसोय थांबणार; पशुचिकित्सालयांच्या वेळेत बदल

sakal_logo
By
सूरज पाटील

यवतमाळ : शेतकरी मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय करतात. 1996च्या परिपत्रकात दिलेल्या वेळेनुसारच पशुचिकित्सालय सुरू राहत होते. त्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने आंदोलनाचे हत्यारही उपसण्यात आले होते. 1996मध्ये झालेली चूक पशुसंवर्धन विभागाने तब्बल 25 वर्षांनी 2021मध्ये सुधारण्यात आली आहे. आता पशुचिकित्सालय सलग सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत सुरू राहणार आहे.

पशुवैद्यकीय दवाखाने हे पशुसंवर्धन विभागाच्या आदेशानुसार दररोज दोन सत्रात सुरू राहत होते. ही वेळ पशुपालकांच्यादृष्टीने अतिशय गैरसोयीची होती. त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, या मागणीसाठी विविध संघटना, ग्रामपंचायतीकडून निवेदने, विनंती अर्ज संबंधित विभागाला देण्यात आली होती. पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या वेळा सलग असाव्यात, अशी अपेक्षा आंदोलनातून व्यक्त करण्यात येत होती. त्यासंदर्भात जिल्हा परिषदांकडून पशुसंवर्धन आयुक्तालयाने अभिप्रायदेखील मागविले होते. 

जाणून घ्या - 'त्या' चौघांचे मृतदेह बघून आई-वडिलांनी फोडला टाहो; हिवरा-हिवरी गावात पसरली शोककळा; सरपंचांनाही अनावर झाले अश्रू

पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या वेळा सुधारित करण्यात येऊन जुने आदेश व परिपत्रक रद्द करण्यात आले आहेत. सुधारित वेळेची अंमलबजावणी गुरुवारपासून (ता. सात) करण्यात येत आहे. कार्यालयात काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा सकाळी कामाच्या वेळेपूर्वी अर्धातास पूर्वी व संध्याकाळी अर्धातास उशिरापर्यंत राहणार आहे.
 
अशी असेल वेळ

सोमवार ते शुक्रवार सकाळी नऊ ते दुपारी साडेचारपर्यंत पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी एक व दोन, तालुका पशुचिकित्सालय, जिल्हा पशुचिकित्सालयाची वेळ राहणार आहे. दुपारी एक ते दीडपर्यंत जेवणाची सुटी राहणार आहे. शनिवारी सकाळी आठ ते दुपारी एकपर्यंत दवाखाने सुरू राहणार आहेत.

जाणून घ्या -  'तिच्या' घरी सुरु होती लग्नाची लगबग पाहुणेही होते तयार; तेवढ्यात आला फोन अन् एका क्षणात सगळंच संपलं 

नवीन आदेशाची अंमबजावणी सुरू झाली असून, शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नवीन वेळ शेतकऱ्यांच्या सोयीची आहे. पूर्वी जानेवारी महिन्यात सकाळी सात ते दुपारी बारा व तीन ते पाच अशी वेळ होती. फेब्रुवारी महिन्यापासून आठ ते दुपारी एक व चार ते सहा अशी वेळ राहत होती. आता सलग वेळ देण्यात आली आहे.
-डॉ. किशोर बन्सोड, 
एलडीओ, पशुसंवर्धन विभाग, दारव्हा.

संपादन - अथर्व महांकाळ