आत्महत्येप्रकरणी पीआयसह आठ जणांविरुद्घ गुन्हा; दखल न घेणे भोवले

सूरज पाटील
Sunday, 24 January 2021

पोलिसांनी मृत्यूप्रकरणाची कोणतीही दखल न घेता तुमच्या मुलाने आत्महत्या केली, असे म्हणत तपास बंद केला. या प्रकरणी माहिती अधिकारी तसेच उच्च न्यायालय खंडपीठ येथे याचिका दाखल केली.

यवतमाळ : शासकीय कर्मचारी असलेल्या विवाहित तरुणाच्या आत्महत्या प्रकरणाची दखल न घेणे अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या तत्कानील पोलिस निरीक्षकांसह विद्यमान ठाणेदारांना भोवले आहे. नागपूर येथील उच्च न्यायालयाच्या आदेशाने आठ जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आल्याने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

विजय गोविंदराव गाढवे (वय ३५, रा. गुरुनानकनगर) असे मृताचे नाव आहे. त्याने २६ जून २०१८ रोजी दांडेकर ले-आऊटमधील सासरी गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. आपल्या मुलाचा मृत्यू सासरच्या मंडळींनी मारल्यामुळे झाल्याचा आरोप मृताची आई भीमाबाई गोविंदराव गाढवे (वय ७०, रा. गुरुनानकनगर) यांनी केला होता. तशी तक्रार अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिली होती.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

मात्र, पोलिसांनी मृत्यूप्रकरणाची कोणतीही दखल न घेता तुमच्या मुलाने आत्महत्या केली, असे म्हणत तपास बंद केला. या प्रकरणी माहिती अधिकारी तसेच उच्च न्यायालय खंडपीठ येथे याचिका दाखल केली. मुलाच्या मृत्यूस सासरची मंडळी जबाबदार आहे, खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाने पोलिस अधीक्षकांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले.

भीमाबाई गाढवे यांच्या तक्रारीवरून रेश्मा विजय गाढवे (वय २७), बाबाराव आठवले (वय ६०),छबूबाई आठवले (वय ५०), रिषभ आठवले (वय २२, सर्व रा. दांडेकर ले-आऊट), पोलिस कर्मचारी सतीश चौधरी, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर धावळे, तत्कालीन ठाणेदार दिनेश शुक्ला, पोलिस निरीक्षक आनंद वागतकर यांच्याविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Charges filed against eight persons including PI in suicide case