Chemical fertilizer floating on water at Bhandara
Chemical fertilizer floating on water at Bhandara

तुमच्यासाठी शेतकरी म्हणजे थट्टेचाच विषय नाही का? काही तर शरम करा, कोणते कोणते दिवस दाखवणार...

लाखनी (जि. भंडारा) : पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. विहिरीची सोय असणाऱ्यांनी कशीतरी रोवणी केली. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी मिश्र खताचा डोस दिला. पण, त्यातून नवीनच प्रकार उघड झाल्याने येथील शेतकरी आश्‍चर्यचकित झाले आहेत. वाचा काय झाले शेतकऱ्यांसोबत… 

लाखनी येथील शेतकरी नरेंद्र देशमुख यांनी भय्याजी कृषिकेंद्रातून आरसीएफ कंपनीद्वारे निर्मित सुफला २०:२०:०:१३ हे मिश्र खत खरेदी केले. शेतात रोवणी झाल्यानंतर त्यांनी शुक्रवारी (ता. ३१) पिकाला खताची मात्रा दिली. मात्र, शेतात खत टाकल्यावर खताचे काही दाणे पाण्यावर तरंताना आढळले. त्यामुळे त्यांनी जिथे आधी खत टाकले होते. त्या बांधीत जाऊन पाहिले तर त्यांना आश्‍चर्याचा धक्काच बसला.

पाणी साचलेल्या बांधीत खत पाण्यावर तरंगत असलेले दिसून आले. आपल्या डोळ्यावर विश्‍वास ठेवता त्यांनी जवळच्या शेतकऱ्याला बोलावून त्याला हा प्रकार दाखवला. रासायनिक खत कधीही पाण्यावर तरंगत नाही अशी माहिती जवळच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने दिल्यामुळे आपली फसवणूक तर झाली नाही, असा प्रश्‍न श्री. देशमुख यांच्या मनात निर्माण झाला. 

त्यांनी लगेच पंचायत समितीचे कृषी अधिकारी माणिक जांभूळकर यांना भ्रमणध्वनीद्वारे या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर जांभूळकर यांनी त्यांच्या बांधावर भेट देऊन पाहणी केली. यानंतर तालुक्‍यातील कृषिकेंद्रांना रासायनिक खताची विक्री थांबवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच झालेल्या प्रकाराची माहिती कंपनीचे अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी व वरिष्ठांना दिली. त्यावरून कंपनीचे अधिकारी, कृषी अधिकारी व शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली. 

पोकळीमुळे तरंगले खत

रासायनिक मिश्र खताचे कोटिंग करताना टाकाऊ कृषी उत्पादनांचा वापर केला जातो. असे कोटिंग करताना हवेतील आर्द्रतेमुळे पोकळी निर्माण होते. ते खत भिजल्यावर त्यात हवा पाणी शिरल्याने खताचे दाणे पाण्यावर येतात. नंतर काही वेळाने जमिनीवर बसतात, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.

अहवाल आल्यावर सत्यता समजून येईल 
खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावर सत्यता समजून येईल. 
- एम. के. जांभूळकर, 
कृषी अधिकारी, पं. स. लाखनी

पिकाला किती फायदा होईल 
रोवणी झाल्यानंतर शुक्रवारी बांध्यांत खत मारले. काही वेळाने काही खत पाण्यावर तरंगताना दिसून आले. या खताचा पिकाला किती फायदा होईल असा प्रश्‍न आहे. 
- सुनील देशमुख, 
शेतकरी, लाखनी

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com