मुख्यमंत्री, तुम्ही परत नागपूरला या 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन 
- तेरा दिवसांपासून सरकार स्थापन करण्यास अयशस्वी 
- सरकार स्थापन करायचं सोडून "चुहा-बिल्ली'चा खेळ सुरू 
- "तुम्ही पुन्हा येणार नाही' अशा आशयाचे फलक 

नागपूर : देवेंद्र फडणवीस, तुम्ही तेरा दिवसांपासून सरकार स्थापन करण्यास अयशस्वी झाले आहात, तुम्ही मुख्यमंत्री बनू शकत नाही. त्यामुळे मुंबईला बाय बाय करून नागपूरला परत या, अशा घोषणा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलच्या वतीने बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या रामगिरीसमोर आंदोलन करण्यात आले. 

आंदोलनाचे नेतृत्व सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्‍वर बाळबुधे यांनी केले. मुख्यमंत्री तुम्ही परत नागपूरला या, असा संदेश देणारे विविध फलक आंदोलनादरम्यान झळकवण्यात आले. महायुतीला जनतेने कौल दिला. 13 दिवस उलटूनही युतीला सत्ता स्थापन करता आली नाही. सत्ता स्थापनेची मुदत संपायला एक दिवस आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदाचा दावा सोडायला तयार नसल्याने फडणवीस यांनी नागपूरला परत यावे आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, असे बाळबुधे म्हणाले. 

आंदोलनात अलका कांबळे, अविनाश गोतमारे, सतीश इटकेलवार, डॉ. विलास मूर्ती, महेंद्र भांगे, मोरेश्‍वर जाधव, रिजवान अन्सारी, रूद्रा धाकडे, जतीन मलकान, अजहर पटेल, गोपाल ठाकूर, मोरेश्‍वर फटिंग, नितीन नायडू, प्रणय जांभूळकर, रेखा गौर, डॉ. मीनाक्षी वाडबुधे, पुष्पा डोंगरे, शोभा भगत, चंद्रकला पाटील, मंदा वैरागडे, नेहा गौर, विजया लालझरे आदी सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला आंदोलनात औक्षण 
राज्यातील मतदारांनी युतीला कौल दिला. ते सरकार स्थापन करायचं सोडून "चुहा-बिल्ली'चा खेळ सुरू आहे. असेच भांडण चालत असेल तर राज्य कारभार चालवणे युतीला कठीण होईल. "तुम्ही पुन्हा येणार नाही' अशा आशयाचे फलक लावून महिलांनी फलकावरील मुख्यमंत्र्यांच्या छायाचित्राला आंदोलनात औक्षण केले. 

पवार साहेब... महाराष्ट्राला पुरोगामी सरकार द्या 
बळीराजाला वाचवण्यासाठी, बहुजनाच्या हितासाठी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी, महिलांच्या रक्षणासाठी, व्यापार, उद्योग वाचविण्यासाठी, महाराष्ट्र घडवण्यासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी शरद पवारांच्या पुढाकाराची गरज आहे. त्यामुळे "पवार साहेब कसंही करा महाराष्ट्राला पुरोगामी सरकार द्या', अशी मागणीही आंदोलकांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister, you should come back to Nagpur