मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शांततेत मतदान : 3 पर्यंत 40 टक्‍के

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

- भागवत, फडणवीस, गडकरींसह अनेकांनी बजावला हक्‍क

नागपूर : लोकशाहीचा उत्सव असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी शहरात दुपारपर्यंत अत्यंत शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. यावेळी शहरात सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त होता. दुपारी तीन वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 40 टक्‍के मतदान झाल्याची माहिती आहे.
मतदानासाठी अनेक भागांत सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहनजी भागवत, तमिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, भैयाजी जोशी, खासदार कृपाल तुमाने यांच्यासह अनेकांनी स्वत: सहपरिवारासह ठिकठिकाणी मतदानाचा हक्‍क बजावला. राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, साहित्य, सामाजिक, कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विविध ठिकाणी मतदान केले. सुरुवातीला मतदान काहीसे संथगतीने झाले. दुपारनंतर मतदानाने अधिक वेग पकडला. काही ठिकाणी सकाळपासूनच मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहिल्यांदा मतदानाचा हक्‍क बजावणाऱ्या युवा मतदारांसह ज्येष्ठ नागरिकांमध्येही मतदानासाठी कमालीचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी अंध, अपंग व मूकबधिर व्यक्‍तींनी मतदान करून या प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. दिव्यांगांना व्यवस्थित मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगांकडून बहुतांश ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.
अनेक ठिकाणी मतदार यादीत नावे शोधण्यासाठी मतदार धावपळ करताना दिसले; तर काही भागांत यादीत नसल्याने तसेच नाव बदलल्याने अनेकांना मतदानापासून वंचित राहाले लागले. ठिकठिकाणी उमेदवारांचे कार्यकर्ते व पदाधिकारी बुथवर लॅपटॉप व मोबाईलच्या साहाय्याने मतदारांना त्यांची नावे शोधून देण्यात सहकार्य करताना दिसून आले. काही ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने तसेच व्हीव्हीपॅटमध्ये बिघाड झाल्याने मतदारांना मतदानासाठी प्रतीक्षा करावी लागली. त्यामुळे मतदारांमध्ये नाराजी व रोष दिसून आला. ईव्हीएमसंदर्भात कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्याची माहिती आहे. मतदानाचे वेळी सर्वच मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त असल्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडली नाही. निवडणूक आयोगासह स्थानिक प्रशासनानेही मतदानासाठी जय्यत तयारी केली होती. पोलिसांनीही आपापली ड्यूटी सांभाळून मतदान केले. मतदानासाठी काही व्यक्‍ती विदेशातूनही आल्याचे सुखद चित्र या निमित्ताने पाहायला मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chief Minister's nagpur vote in peace : Up to 3 per cent