मेळघाटची नवी ओळख; रोजगारामध्ये चिखलदरा प्रथम क्रमांकावर, मजुरांचे स्थलांतरही घटले

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 February 2021

निरक्षरता व दारिद्र्यामुळे झालेली आरोग्याची हेळसांड यामुळे आदिवासींच्या आयुष्यात कुपोषणाचा शिक्का बसला. मागील वर्षीपेक्षा यावर्षी गावातील स्थलांतर कमी झाले असून किमान ६० ते ७० टक्के कामगार गावातच काम करीत आहेत.

मांजरखेड(जि. अमरावती) : जागतिक नकाशावर मेळघाटची प्रथम ओळख झाली ती कुपोषण व आदिवासींच्या स्थलांतरामुळे. त्यानंतर मेळघाट प्रसिद्ध झाले ते व्याघ्र प्रकल्पामुळे. पण आता मेळघाट नव्याने आपली ओळख निर्माण करत आहे. राज्यस्तरावर चिखलदरा तालुका रोजगाराच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर असून यावर्षी मनुष्यदिन रोजगार संदर्भात विक्रमी नोंद करत आहे. 

हेही वाचा - सावधान! आठ दिवसांत ४ हजार रुग्णांची वाढ, नव्याने साडेसातशे बाधित; मृत्यूही वाढले

निरक्षरता व दारिद्र्यामुळे झालेली आरोग्याची हेळसांड यामुळे आदिवासींच्या आयुष्यात कुपोषणाचा शिक्का बसला. मागील वर्षीपेक्षा यावर्षी गावातील स्थलांतर कमी झाले असून किमान ६० ते ७० टक्के कामगार गावातच काम करीत आहेत. उर्वरित नागरिकांनी यापूर्वीच ठेकेदाराकडे केलेल्या करारामुळे २० ते ३० टक्के नागरिकांनी आपले गाव सोडले आहे. आदिवासींच्या जीवनात ही 'प्रकाशवाट' निर्माण झाली ती प्रशासनाच्या सकारात्मक पुढाकारामुळे. केवळ ग्रामपंचायतस्तरावर नमुना ४ हा अर्ज केला की सहज लोकांच्या हाताला काम मिळत आहे. चिखलदरा तालुक्‍यातील एकूण ५४ ग्रामपंचायतींअंतर्गत मागील वर्षीपर्यंत ४५ हजार मजुरांनी काम केले. यावर्षी यात तब्बल ८ हजार मजुरांची वाढ झाली आहे. 

महात्मा गांधी रोजगार हमी योजनामुळे आता तब्बल दीडशे दिवसांपेक्षा जास्त दिवस रोजगार उपलब्ध होत आहे. मनरेगामुळे केंद्र सरकारने १०० दिवसांची रोजगाराची हमी दिली. त्यात राज्यसरकारने २६५ दिवस कामाची हमी दिली. त्यामुळे आता चिखलदरा तालुक्‍यात एका कुटुंबात तब्बल १००० दिवस (मनुष्यदिन) रोजगार उपलब्ध होत आहे. शिवाय गावातल्या गावात दोनशे रुपयाच्यावर मजुरी मिळत आहे. 

हेही वाचा - राकेश टिकैत यांना पोलिस अधीक्षकांच्या नावाने 'फेक कॉल', अखेर यवतमाळातील सभा...

मिशन मेळघाट -
मेळघाटातील कुपोषण व स्थलांतराचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मेळघाटावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी एक गट स्थापन करण्यात आला आहे. गटाच्या माध्यमातून शिक्षण व आरोग्य या क्षेत्रासाठी नावीन्यपूर्ण उपक्रमाची निर्मिती केली जाणार आहे. यापूर्वी येथे काम केलेल्या व सध्या काम करीत असलेल्या व ज्यांची इच्छा आहे; त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे. 

वर्ष रोजगार मजूर सरासरी रोजगार खर्च (कोटी ) मनुष्यदिन 
२०१९-२० ७३३८ ४५६०९ ११० ४८ १९,२३,३३५ 
२०१९-२० १०६६५ ५३०१२ १४४ ६१ २८,३५,३१७

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chikhaldara taluka ranks first in employment in state