मेळघाटावर अर्भक मृत्यूचा डाग कायम

राज इंगळे 
सोमवार, 1 जुलै 2019

जन्म होताच पहिल्या काही मिनिटांत मेळघाटात बालके दगावत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील एक एप्रिल २०१८ ते ३० मार्च २०१९ पर्यंत जवळपास १९७ अर्भकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

अचलपूर, (जि. अमरावती) -  जन्म होताच पहिल्या काही मिनिटांत मेळघाटात बालके दगावत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मागील एक एप्रिल २०१८ ते ३० मार्च २०१९ पर्यंत जवळपास १९७ अर्भकांचे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

याचाच प्रत्यय पुन्हा १४ जून रोजीसुद्धा आला. चिखलदरा तालुक्‍यातील जामली आर येथील गर्भवती मातेने तिळ्यांना जन्म दिला. मात्र, आयुष्याची सुरवात करण्यापूर्वीच या तिळ्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अर्भक मृत्यू कमी करण्यासाठी तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ‘निओनॅटॅलॉजिस्ट’ तज्ज्ञांची समिती नेमली होती. मात्र, पुढे त्या समितीचे काय झाले, कोणालाही माहीत नाही. चिखलदरा तालुक्‍यातील दुर्गम भागात आजही गरोदर महिलांची आरोग्य केंद्रांअभावी व बालविकास विभागाच्या दुर्लक्षपणामुळे घरीच प्रसूती होते. मात्र, अर्भक मृत्यूचा टक्का कमी करण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचे दिसून येते. मेळघाटातील अनेक गर्भवती मातांची प्रसूती घरी झाल्यानंतरही ती आरोग्य केंद्रात नोंदविले जात असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. यावरून आजही मेळघाटात कागदोपत्री सर्व कामे केली जात असल्याचे दिसून येते.

...अन्‌ खापर आरोग्यावर 
मेळघाटात उपजत (अर्भक) मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत आहे. याला कारणीभूत आयसीडीयस विभाग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गर्भवती महिलांना पोषक आहार मिळत नाही. परिणामी महिलांची प्रतिकारशक्ती कमी होत जाते. सोबतच कुपोषित बालके जन्माला येण्याचे प्रमाणसुद्धा जास्त असल्याचे तज्ज्ञ डॉक्‍टर सांगतात. मात्र, उपजत मृत्यूचे खापर आरोग्य विभागावरच फोडण्यात येते.

मेळघाटातील होणारे नवजात अर्भकांचे मृत्यू ही चिंतेची बाब आहे. कोणत्याही आदिवासी महिलेला आपले मूल मृत्युमुखी पडावे, असे वाटणार नाही. याकरिता आदिवासींसाठी असणाऱ्या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याची गरज असून, आयसीडीयस व आरोग्य विभागाने समन्वय साधून काम करण्याची मेळघाटामध्ये गरज आहे. 
- बंड्या साने, संस्थापक, खोज संस्था.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: child death remains on Melghat