`मनुताई’च्या 14 रत्नांच्या पाठीवर बालविकास मंत्र्यांची कौतुकाची थाप

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 February 2020

राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेतून थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली झेप

अकोल : खेड्यातून आलेल्या 14 जणी... शेतकरी-शेतमजुर कुंटुबातील मराठी माध्यमात शिकणाऱ्या... शिक्षण घेण्याची मनापासून धडपड... काहीतरी वेगळे करण्याची जिद्द.. यातूनच जन्म घेतला समाजोपयोगी स्वयंचलीत रोबोटने... हा रोबोट मुबंईतील राष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत मनुताई कन्या शाळेतील विद्यार्थिनींना प्रथम क्रमांक पटकावून देणारा ठरला आणि आता थेट अमेरीकेत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या टीममधील 14 रत्नांच्या पाठीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी कौतुकाची थाप दिली.

 

ॲड.यशोमती ठाकूर यांनी 22 फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात या मुलींच्या कामगिरीचे कौतुक केले. अमेरिकते भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौदा रत्नाचे कौतुक करताना त्यांना अमेरिकेतील सादरीकरणाकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.पल्लवीताई कुळकर्णी, संस्थेचे मार्गदर्शक अनिरुध्द चौधरी तसेच काँग्रेसचे नेते अविनाश देशमुख, साजिदखान पठाण, खतीप, कोरपे, धाबेकर, अशोकजी मानकर, नानासाहेब चौधरी, सौ. आशाताई मिरगे व संस्थेचे सर्व पदाधिकारी व ससदस्य यांच्या बरोबर समाजातील प्रतिष्टीत व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन सौ.अग्निहोत्री यांनी केले तर आभारप्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. धारस्कर यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

अमेरिकेत जाण्यासाठी हवी आर्थिक मदत
आंतरराष्ट्रीय रोबोटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या चौदा रत्नाच्या टीमसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अमेरिकेला जाण्यासाठी मुलींकडे पैसा नाही; सर्व गरीब कुटुंबातील आहेत. संस्थाही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जग जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या मुलींना मदत करण्याची ग्वाही महिला व बालकल्याण विकास मंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी समाजातील सहृदयी व्यक्तींनाही या मुलींना मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहानाला माउली फाउंडेशन संस्थेचे अध्यक्षांनी प्रतिसाद देत 11 हजारांचा धनादेश मदत म्हणून दिली. एवढ्या मदतीवर निश्‍चितच भागणार नाही. त्यामुळे सक्षम असलेल्या समाजातील सहृदयी व्यक्तींनी स्वंयस्फूर्तीने पुढे येऊन या मुलींना अमेरिकेत जाऊन अकोल्याचे नाव उंचावण्यासाठी आर्थिक मदत करण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Child development ministers praise the 14 gemstones of 'Manutai'