esakal | विजेच्या धक्‍क्‍यातून आईला वाचविण्यासाठी मुलाने घेतला निर्णय...पण
sakal

बोलून बातमी शोधा

राजेश तुमन्ने

घरातील केरकचरा काढत असताना आईचा कूलरला स्पर्श झाला. त्यामुळे तिला विजेचा झटका बसला. अखेर झोपेतून उठलेल्या मुलाने आईच्या मदतीसाठी धाव घेतली आणि त्यालाही कूलरचा स्पर्श झाला. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 4) लाखांदूर येथे घडली.

विजेच्या धक्‍क्‍यातून आईला वाचविण्यासाठी मुलाने घेतला निर्णय...पण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर (जि. भंडारा) : सकाळी सकाळी कूलर जवळून केरकचरा काढत असताना विजेचा धक्का लागल्याने आईने आरडाओरड केली. त्यावेळी झोपेतून उठून आईला वाचविण्यासाठी धावत गेलेल्या मुलालासुद्धा विजेचा धक्का बसला. यात आईला वाचविण्याच्या प्रयत्नात मुलाचा मृत्यू झाला.

ही घटना सोमवारी (ता. 4) सकाळी सहाच्या सुमारास घडली. राजेश बळिराम तुमन्ने (वय 20), असे मृताचे नाव आहे. अनुसया बळिराम तुमन्ने (वय 45) असे जखमी आईचे नाव आहे.

लाखांदूर येथील तुमन्ने कुटुंबीय सोमवारी (ता. 4) सकाळी झोपून उठले. त्यानंतर महिलेने घरातील केरकचरा काढण्यास सुरुवात केली. तापमान वाढलेले असल्यामुळे रात्रीपासून कूलर सुरूच होता. अनुसया तुमन्ने कूलर जवळून कचरा काढत असताना कूलरला स्पर्श झाल्याने त्यांना विजेचा झटका बसला. त्यामुळे त्या जोरात किंचाळल्या.

जाणून घ्या : गुंड प्रवृत्तीच्या युवकाचा असाही झाला शेवट...

जखमींना केले ग्रामीण रुग्णालयात दाखल

यावेळी झोपून असलेला मुलगा राजेश उठून आईला वाचविण्यासाठी तिच्याजवळ धावत आला. मात्र, त्याने आईला स्पर्श करताच त्यालासुद्धा विजेचा झटका बसला. यावेळी झालेल्या आरडाओरडीमुळे कुटुंबीय व शेजारी घटनास्थळी धावून आले. समयसूचकता ठेवत त्यांनी वीजप्रवाह तातडीने बंद केला. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला; तर जखमी आईवर उपचार सुरू आहेत.

लाखांदुरात हळहळ व्यक्त

आईला वाचविताना मुलाचा जीव गेल्याची हृदयद्रावक घटना घडल्याने लाखांदुरात हळहळ केली जात आहे. पोलिसांनी घटनेची नोंद केली आहे. ठाणेदार शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गोपाल कोसरे घटनेचा तपास करीत आहेत.