esakal | भयंकर! एकविसाव्या शतकातही बालविवाह, बालकल्याण समितीमुळे वाचली अल्पवयीन मुलगी
sakal

बोलून बातमी शोधा

bal vivah.

अकोला येथील एका अल्पवयीन बालिकेचा अमरावतीच्या भातकुली तालुक्‍यातील आष्टी या गावात 10 जुलै रोजी बालविवाह होत असल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात आली. मुलीचे वय निश्‍चित करण्यात आले व गावस्तरीय यंत्रणेला कळविण्यात आले.

भयंकर! एकविसाव्या शतकातही बालविवाह, बालकल्याण समितीमुळे वाचली अल्पवयीन मुलगी

sakal_logo
By
संतोष शेंडे

टाकरखेडा संभू (जि. अमरावती) : बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असूनही अजूनही बालविवाहाच्या घटना अधूनमधून कानावर येतच असतात. 18 वर्षाखालील मुली या विवाहासाठी शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तयार नसतात, तरीही त्यांचे कुटुंबिय कायदा डावलून अशी लग्ने करण्याचा प्रयत्न करतात. अशीच एक घटना नुकतीच भातकुली तालुक्‍यातील आष्टी येथे घडली. मात्र त्या मुलीचे नशीब बलवत्तर होते, त्यामुळे या विवाहाची माहिती बालकल्याण समितीला वेळीच मिळाली आणि आज आयोजित केलेला हा विवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले. घटनेची माहिती मिळताच समितीच्या पथकाने आष्टी येथे पोहोचून त्यांच्या नातेवाइकांना हा विवाह न करण्याच्या सूचना देत कारवाईचा इशारा दिला. अखेर हा विवाह नातेवाइकांना रद्द करावा लागला.

अकोला येथील एका अल्पवयीन बालिकेचा अमरावतीच्या भातकुली तालुक्‍यातील आष्टी या गावात 10 जुलै रोजी बालविवाह होत असल्याची माहिती अमरावतीच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाला देण्यात आली. मुलीचे वय निश्‍चित करण्यात आले व गावस्तरीय यंत्रणेला कळविण्यात आले. अमरावती जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या न्यायअधिकारी सीमा भाकरे व समुपदेशक आकाश बरवट, पोलिस पाटील, चाईल्डलाईन यांनी प्रत्यक्ष गावाला भेट दिली. सर्वांनी संबंधित कुटुंबातील बालिका 17 वर्षाची आहे त्यामुळे तिचा विवाह बेकायदेशीर असल्याचे कुटुंबियांना पटवून दिले. बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाह कायद्याबाबत माहिती सांगून त्यामध्ये नमूद असलेल्या शिक्षेची व कार्यवाहीची माहिती देण्यात आली. बालिका व तिच्या आईचे समुपदेशन करण्यात आले.

 सविस्तर वाचा - अन्‌ थांबविला "त्या' मुलीचा विवाह, काय होते कारण...

मुलीच्या आईने नियोजित विवाह आम्ही मुलीची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर करू, अशी हमी सर्व पदाधिका-यांना दिली, तसा लेखी जवाब जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे विधी अधिकारी यांच्याकडे मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी नोंदविला. यावेळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच, पोलिस पाटील प्रवीण प्रधान, चाईल्डलाइनचे समन्वयक कपूर व टीम मेंबर देशमुख, वलगावचे पथक उपस्थित होते. सदर सर्व कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील मेसरे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 सविस्तर वाचा - महिला गृह उद्योगाने कसली कंबर, देणार चिनी उत्पादनाला आव्हान; वाचा कुणी घेतला पुढाकार...

अखेर संबंधित विवाह रद्द
आम्हाला अकोला येथील अल्पवयीन युवतीचा विवाह होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आमचे पथक गावात पोहोचले. नातेवाइकांचे समुपदेशन करून सदर विवाह रद्द करण्यास आम्ही त्यांना भाग पाडले. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2007 अन्वये 18 वर्षाच्या आतील मुलीचा विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे, 18 वर्षाच्या आतील मुलीचा बालविवाह केल्यास किंवा घडवून आणल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्याची तरतूद आहे. आपल्या आजूबाजूला असे बालविवाह होत असल्यास त्याबाबतची माहिती त्वरित जिल्हा बाल संरक्षण कक्षास द्यावी.
अजय डबले,
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, अमरावती

संपादन - स्वाती हुद्दार