रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने चिमुकलीचा मृत्यू

File photo
File photo

अमरावती : केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य मिशनअंतर्गत चोवीस तास गरजू रुग्णांच्या मदतीसाठी 108 रुग्णवाहिका सुरू करण्यात आली. परंतु, अनेकदा ही रुग्णवाहिका त्यांचे नियंत्रण कक्षात फोन करूनसुद्धा वेळेवर पोहोचत नसल्याने एका चिमुकलीला जीव गमाविण्याची वेळ आली.
जीवनदायिनी म्हणून सुरू करण्यात आलेली 108 रुग्णवाहिका मरणदायिनी ठरत असल्याचे दिसून येते.
दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पूर्णानगर येथील अनुष्का नितीन वानखडे (वय 3) ही बालिका गावात बालवाडीत शिकत होती. शनिवारी (ता.सात) अचानक तिची प्रकृती बिघडली. श्‍वास घ्यायला त्रास होत असल्याने तिला उपचारासाठी वडिलांनी बेशुद्ध झाल्यावर गावातील प्राथमिक आरोग्यकेंद्रात दाखल केले. डॉक्‍टरांनी तिला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. रात्री अकराच्या सुमारास ही चिमुकली गंभीर स्थितीत इर्विन रुग्णालयात दाखल झाली. तिची अवस्था बघता पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्याचे आदेश डॉक्‍टरांनी दिले. वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित असल्याने त्यांच्याकडे पुरेसे पैसे उपलब्ध नव्हते. काही लोकांनी 108 रुग्णवाहिकेसाठी त्यांच्या टोल फ्री क्रमांकावर फोन केला असता रुग्णवाहिका पाठवित असल्याचा मॅसेज मिळाला. ही रुग्णवाहिका येत नसल्याने काहींनी अडीच हजार रुपये गोळा करून तिच्या वडिलांसाठी एका खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, घटनेच्या वेळी पुरेशी सुविधा असलेली खासगी रुग्णवाहिका येथे मिळू शकली नाही. स्वत: ड्यूटीवर उपस्थित डॉक्‍टरांनीसुद्धा 108 रुग्णवाहिकेसाठी प्रयत्न केला. अखेर वेळेवर जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत चालकास रात्रीच बोलविले. तिला इर्विनची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. चालक येईपर्यंत पहाटे पाच वाजले. इर्विनच्या रुग्णवाहिकेत टाकून चिमुकलीला उपचारासाठी नागपूरला हलविले. परंतु, ही रुग्णवाहिका रहाटगावपर्यंत जात असताना वाटेतच चिमुकल्या अनुष्काचा मृत्यू झाला, असे डॉक्‍टरांनी सांगितले.

ज्यावेळी ही मुलगी इर्विनमध्ये दाखल झाली तेव्हा तातडीने उपचार करून जीव वाचविण्याचा डॉक्‍टरांनी प्रयत्न केला. प्रकृती खालावत गेल्याने ऐनवेळेवर रुग्णालयाच्या चालकाला बोलावून रुग्णवाहिका तयार केली. तिला नागपूरला हलविले, परंतु वाटेतच तिचा मृत्यू झाला.
-डॉ. श्‍यामसुंदर निकम,
जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com