तरुणाईला चायनीज हुक्‍क्‍याचा नाद 

सतीश घरड
रविवार, 22 सप्टेंबर 2019

टेकाडी (जि.नागपूर) : कन्हान व आसपासच्या परिसरात तरुणाईला चायनीज हुक्‍क्‍याचा नाद लागला आहे. आसपासच्या परिसरात सहजतेने उपलब्ध होणारा हा हुक्‍का घेऊन "दम' मारण्यासाठी अवैधरित्या गांजाची खरेदी करीत असून यामुळे विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. पोलिसांनी गांजावर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढाकार घ्यावा व अशा विक्रेत्यांना जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे.

कन्हान पोलिस ठाण्यांतर्गत गांजाची राजरोस विक्री सुरू असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. वीस रुपयांच्या गांजाच्या छोट्या पाकिटाने अल्पवयींनाना नशेची भुरळ घातली आहे. कन्हान, टेकाडी, कोयला खदान आणि कांद्री परिसरात गांजाच्या व्यसनाने तरुणाईला व्यसनाधीन करून सोडले आहे. देशात जवळपास अडीचशे प्रकारच्या अमली पदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने गांजा या पदार्थाचा समावेश आहे. परंतु, सध्या पोलिसांच्या नाकाखाली टिच्चून क्षेत्रात सर्रास गांजा विक्रीचे प्रमाण वाढल्याची माहिती पुढे आलेली आहे. गांजाचे लहान पाकीट वीस ते तीस रुपयाला मिळत असून तीन लोक दोन वेळेच्या गांजाची भूक भागवू शकतात. यामुळे वयस्क शौकिनांसोबतच्या बैठकांमध्ये अल्पवयीन मुले व्यसनांच्या आहारी गेली आहेत. रात्रीला आडोशातील अंधार तर दिवसाला गावाबाहेर एखाद्या झाडाखाली निवांत किंवा अडगळीत पडलेली ठिकाणे ही नशा करण्याची अड्डे बनली आहे. यावर पालकांनी चिंता व्यक्त केली असून पोलिस, सामाजिक संस्था व इतर यंत्रणांवर याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. 
व्यसनासाठी वर्गणी 
नागपूर किंवा कामठी शहरांमध्ये "चायनीज हुक्का पॉट' सातशे ते आठशे रुपयाला सहज मिळतो. सोबत हजारो प्रकारचे फ्लेवर असलेले शंभर रुपयांचे "मसाला' पाकीट चार पाच लोकांना धूर करायला साधारणतः चार दिवस पुरतो, यासाठी बेरोजगार पैसे वर्गणी करीत असल्याचे समोर आले आहे. तीस रुपयांत गांजाची पुडी मिळत असल्याने हे व्यसन गडद होत आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chinese hookah sound to young people