होय...सरकीपासून चॉकलेट अन्‌ कुकीज शक्‍य ! 

होय...सरकीपासून चॉकलेट अन्‌ कुकीज शक्‍य ! 

नागपूर - सरकीपासून ढेप आणि तेल मिळते ही झाली सामान्य माहिती. परंतु, सरकीपासून लवकरच चॉकलेट, कुकीजसह नानाविध खाद्यपदार्थ तयार केले जातील. यामुळे विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उत्पन्नाचा आणखी एक मार्ग उपलब्ध होणार आहे. 

मूळचे भारतीय आणि सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले डॉ. कीर्ती राठोड "एडिबल कॉटन'वर गेल्या 23 वर्षांपासून संशोधन करीत आहेत. त्यांच्या प्रयोगाला अखेर यश आले असून, अमेरिकेच्या कृषी विभागाकडे (यूएसडीए) त्यांनी मंजुरीसाठी अर्ज पाठविला आहे. एक ते दोन महिन्यांत या प्रयोगाला मंजुरी मिळण्याची शक्‍यता आहे. संशोधनाला मंजुरी मिळाल्यानंतर शेतकरी खाद्यान्न, तसेच फायबरसाठी कापूस लागवड करू शकतील. 

जनुकांना केले "सायलेन्ट' 
कापसामध्ये "गॉसीपॉल' असते. "गॉसीपॉल'मुळे कापसाच्या बिया आणि पानांवर संरक्षणात्मक थर तयार होतो. हा थर कीटक आणि किडींपासून पिकांचा बचाव करीत असतो. यामुळे सरकी माणसांसाठी खाण्यायोग्य ठरत नाही. नवीन संशोधन आणि प्रयोगानुसार सरकीमधील जनुके जी या घटकांची निर्मिती करतात त्यांना 90 टक्के "सायलेन्ट' करण्यात यश आले आहे. परिणामी, सरकीपासून तयार होणारे खाद्यपदार्थ मानवासाठी खाण्यायोग्य ठरणार आहेत. 

शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी 
"एडिबल कॉटन'पासून पोल्ट्री, मत्स्य शेती, तसेच वराहपालनसाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपुरवठा शक्‍य आहे. तसेच सरकीच्या भुकटीचा चॉकलेटसह काही स्नॅक्‍समध्येही वापर शक्‍य आहे. कापूस उत्पादकांसाठी यामुळे उत्पादनवाढीचे अतिरिक्त पर्याय उपलब्ध होतील, असा विश्‍वास राठोड यांनी व्यक्त केला. 

पोषणमूल्याने भरपूर 
महाराष्ट्रासह भारत आणि जगभरात कुपोषणाची मोठी समस्या आहे. सध्या भारतात दहा ते बारा दशलक्ष टन सरकीचे उत्पादन होते. "एडिबल कॉटन'पासून तयार होणारी सरकी ही प्रथिनांच्या बाबतीत भुईमुगाच्या समतुल्य राहील. अनेक प्रकारच्या अन्न प्रक्रिया उद्योगात या प्रथिनांचा वापर करून उच्च पोषणमूल्य असलेले पदार्थ तयार करता येणे शक्‍य आहे, असे झाल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना कापसासह "एडिबल कॉटन'ची सरकी निर्यात करता येईल. 

सरकीमधील जनुकाला (जीन) "सायलेन्ट' करण्यास यश आले आहे. परिणामी, अशा सरकीपासून निर्माण केले जाणारे खाद्यपदार्थ त्यामध्ये प्रोटिनचे प्रमाण चांगले असल्याने मानवास लाभदायक ठरतील. तसेच "झीरो हंगर' आणि कुपोषणाशी लढण्यासही याची मदत होणार असून, शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. 
-डॉ. केशव क्रांती,  कापूसतज्ज्ञ व माजी प्रमुख सीआयसीआर, नागपूर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com