जगाच्या पोशिंद्यासाठी रविवारी महागावात अन्नत्याग आंदोलन

ज्ञानेश्‍वर ठाकरे
गुरुवार, 16 मार्च 2017

महागाव (जि. यवतमाळ) - सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी 19 मार्च 1986 ला पत्नी मालती व मुलाबाळांसह सामूहिक आत्महत्या केली होती. त्या घटनेने महागाव तालुक्‍यासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळून गेला. या घटनेला 31 वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेच्या स्मृतीनिमित्त व शासन धोरणाचा निषेध करण्यासाठी येत्या 19 मार्चला अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून करपे यांनी ही टोकाची भूमिका घेतली होती, अशी माहिती मारोतराव करपे यांनी "सकाळ'ला दिली. करपे घराण्याने संगीत क्षेत्रातील विशारद पदवी प्राप्त केली होती. साहेबराव यांचे वडील शेषराव पाटील हे संगीत शिक्षक होते. साहेबराव यांच्याकडे वडिलोपार्जित सव्वाशे एकर कोरडवाहू शेती होती. ही जमीन ओलिताची व्हावी, यासाठी त्यांनी त्यादरम्यान त्यातील काही जमीन विकल्याचे कळते. पाटील हे चिलगव्हाण येथील सतत 15 वर्षे बिनविरोध सरपंच राहिले होते. त्यांनी आत्महत्या केली, त्यादरम्यान तब्बल 54 एकर जमीन होती. त्यानंतर त्यांचे बंधू प्रकाश पाटील यांनी कारभार पाहिला.

आत्महत्या झालेल्या वर्धा जिल्ह्यातील दत्तापूर येथील शेतकरी महिला सुमन अग्रवाल यांनीच पाटील कुटुंबीयांचे अंत्यसंस्कार केले होते. पाटील यांनीसुद्धा संगीतात विशारद पदवी प्राप्त केली होती. भीमसेन जोशी यांनी साहेबराव पाटील यांना "माझ्यासोबत काम करा', असा कानमंत्र दिला होता, असे त्यांचे मित्र जळबा खंदारे यांनी सांगितले. राज्यातील पहिलीच शेतकरी आत्महत्या म्हणून या घटनेची नोंद देशपातळीवर घेण्यात आली होती. त्यांच्या स्मृतिदिनी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात चिलगव्हाणवासी, शेतकरी, विविध सामाजिक संघटना, महागाव तालुका पत्रकार संघ, शिवसेना सहभागी होणार आहेत.

शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध महागाव येथील नवीन बसस्थानक परिसरात रविवारी (ता. 19) करण्यात येईल. आंदोलनात सहभागी होण्यासाठी अंबेजोगाई येथून अमर हबीब, पुणे येथून गोपाल चव्हाण, नेर येथील संतोष अरसोड, पुरुषोत्तम राठोड, वाकद येथील मनीष जाधव येणार आहेत.

Web Title: Chuck food agitation in mahagav