अभियांत्रिकीच्या पेपरफूटप्रकरणी "सीआयडी' चौकशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपरफूटप्रकरणी विधानसभेत दाखल झालेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी प्रश्‍न उपस्थित केला. या प्रश्नावर सोमवारी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सीआयडी चौकशीची घोषणा केली.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपरफूटप्रकरणी विधानसभेत दाखल झालेल्या लक्षवेधी सूचनेवर आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी प्रश्‍न उपस्थित केला. या प्रश्नावर सोमवारी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सीआयडी चौकशीची घोषणा केली.
संत गाडगेबाबा विद्यापीठात 27 मे 2019 रोजी अभियांत्रिकी परीक्षेतील इंजिनिअरिंग मॅकेनिक्‍स, या विषयाची प्रश्‍नपत्रिका फुटली होती. यासंदर्भात महाराष्ट्र विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार व इतर विधानसभा सदस्यांनी नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचना दाखल केली होती. ही लक्षवेधी सोमवारी (ता. 24) विधानसभेमध्ये चर्चेला आली. या लक्षवेधीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सभागृहात पटलावर लेखी निवेदन सादर केले.
याबाबत विद्यापीठाने केलेल्या चौकशीत लर्निंग स्पायरल कंपनीचा स्थायी कर्मचारी तसेच सन्मती अभियांत्रिकी महाविद्यालय वाशीम येथील अस्थायी कर्मचारी, या दोघांनी संगनमत करून प्रश्‍नपत्रिका फोडली असल्याचे चौकशीत आढळून आले. या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, पुढील कारवाई विद्यापीठ आदेशान्वये सक्षम प्राधिकरणासमोर कारवाईसाठी सादर करण्यात येत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
डॉ. सुनील देशमुख यांनी सभागृहात अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यांनी विद्यापीठात अस्तित्वात असलेले धोरण बदलवून नवीन धोरण कोणी लागू केले? अत्यंत गोपनीय व संवेदनशील असलेल्या परीक्षा पद्धतीमध्ये व विशेषकरून प्रश्‍नपत्रिका वाटपाच्या व्यवस्थेत खासगी कंपनीचा सहभाग कसा काय घेण्यात आला तसेच प्रश्‍नपत्रिका वितरणाचा पासवर्ड बाहेरच्या अस्थायी कर्मचाऱ्यांना कोणी व का दिला आणि त्याला कोण जबाबदार आहे, अशी विचारणा केली.
कंपनीला काळ्या यादीत टाकणार
या प्रकरणामध्ये लर्निंग स्पायरल कंपनी व विद्यापीठातील कोणते अधिकारी तसेच कर्मचारी यामध्ये सामील आहेत, याची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी डॉ. देशमुख यांनी सभागृहात लावून धरली. दरम्यान, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा सभागृहात केली. या प्रकरणात आरोप असलेल्या खासगी कंपनीला राज्यभरात काळ्या यादीत टाकण्याचा निर्णयसुद्धा मंत्र्यांनी या वेळी जाहीर केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "CID" inquiry in engineering paperleak case