पाण्यासाठी नांगरली नदी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मे 2019

श्रीसंत लहानूजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील नागरिकांनी चक्‍क नदीपात्र नांगरून काढले आहे. या नांगरणीमुळे नदीत आलेले पाणी मुरेल आणि परिसरात भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.

वर्धा - अत्यल्प पावसामुळे कधी नव्हे तेवढा दुष्काळ वर्ध्यात पडला आहे. नदीपात्र कोरडे पडले आहे. यंदा आलेली स्थिती येत्या वर्षात येऊ नये याकरिता येणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन करण्यावर जिल्ह्यात भर देण्यात येत आहे. याच नियोजनाचा भाग म्हणून श्रीसंत लहानूजी महाराज देवस्थान टाकरखेड येथील नागरिकांनी चक्‍क नदीपात्र नांगरून काढले आहे. या नांगरणीमुळे नदीत आलेले पाणी मुरेल आणि परिसरात भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. या कामाकरिता गावकऱ्यांना पाणी फाउंडेशनच्या चमूचे सहकार्य लाभले. 

तबल ४० वर्षांनंतर वर्धा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. यामुळे गावात पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. अनेकांच्या विहिरीचे पाणी आटले आहे. नदी असलेल्या गावातील या स्थितीमुळे गावकऱ्यांच्या मनात पाण्याच्या नियोजनाचा विचार आला. त्यांच्या या नियोजनाला पाणी फाउंडेशनचे सहकार्य लाभले. यामुळे नदीतील पाणी जिरवून भूजल पातळी वाढविण्याकरिता नदी नांगरण्याचा निर्णय झाला. या निर्णयात गावकऱ्यांनी स्वखर्चातून तब्बल ११ एकर नदीपात्र नांगरून काढले. या कामात गावातील ट्रॅक्‍टर चालकांनी सहकार्य केले. 

नऊ ट्रॅक्‍टरने दोन तासांत नांगरणी 
सतत पाण्याखाली असलेली ही जमीन चांगलीच पक्‍की झाल्याचे दिसून आले. यामुळे नांगरणी करण्याकरिता ट्रॅक्‍टर चालकांना चांगलेच प्रयत्न करावे लागले. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर ११ एकर नांगरणी झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens plowed a river deep for water

टॅग्स