वास्तव : भाऊ, दानशूर फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात म्हणून...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 April 2020

लॉकडाउनमुळे छोटे मोठे उद्योगधंदे व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने हातावर पोट भरणाऱ्या गरजू लोकांना दैनंदिन मूलभूत असणाऱ्या गरजांपासून वंचित राहण्याची वेळ नाकारत अनेकांवर येऊन ठेपली आहे.

शेगाव (जि.बुलडाणा) : लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे बंद आहे. हातावर पोट असलेल्या मजुरांचे मोठे हाल होत आहे. गोर-गरीबांना दैनंदिन गरजा भागविणेही अशक्य झाले आहे. अशात अनेक दानशूर पुढे येत आहेत. मात्र, ते मदत करताना फोटो काढत असल्याने नागरिक मदत नाकारत असल्याचे दिसून येत आहे.

संपूर्ण देशात कोरोना आजाराने थैमान घातले असून, यामुळे लॉकडाउन वाढत चालला आहे. लॉकडाउनमुळे छोटे मोठे उद्योगधंदे व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने हातावर पोट भरणाऱ्या गरजू लोकांना दैनंदिन मूलभूत असणाऱ्या गरजांपासून वंचित राहण्याची वेळ नाकारत अनेकांवर येऊन ठेपली आहे. परिसरात ज्यांचे हातावर पोट आहे असे मजूर महिनाभरापासून घरातच बसलेले आहेत.

हेही वाचा - धक्कादायक! अल्पवयीन मुलीला खांद्यावर उचलून नेले मक्याच्या पिकात अन्...

परंतु आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर कुठे जाता येत नसल्याने तसेच पुर्णतः रोजगार बंद झाल्याने अनेकांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू व किराणा संपला आहे. आर्थिक अडचण असल्याने खरेदी करणे शक्य नाही. शासनाने प्रती माणूस रेशन दुकानावर तांदूळ मोफत दिले आहे. मात्र, ते किती दिवस टिकणार त्याच्यासोबत लागणारे साहित्य कुठून आणणार ही मोठी समस्या मजुरांना पडली आहे. काही दानशूर मदत करत आहेत, मात्र ते फोटो घेत असल्याने बहुतांश कुटुंबे ही मदत घेण्यास नाकारत असल्याचे चित्र शहरात बघावयास मिळत आहे. 

आवश्‍यक वाचा - अन् पोलिस सापडला जुगार खेळताना!

मजुरी मिळत नसल्याने घरात लागणारे दैनंदिन मूलभूत गरजा भागविण्यासाठी पैसे नाहीत. आम्हालाही मदतीची गरज आहे. परंतु मदत देणारे फोटो काढून सोशल मीडियावर टाकत आहेत. यामुळे गरज असून, सुद्धा मदत घ्यावीशी वाटत नाही. जर आम्हाला मदत करायची असेल तर कृपया फोटो न घेता मदत करावी, अशी अपेक्षा या गरजू व्यक्तींकडून केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens refuse help as philanthropist take photos and post them on social media