जिल्हा न्यायालयातील शिपायाला  लाच घेताना अटक

जिल्हा न्यायालयातील शिपायाला लाच घेताना अटक

नागपूर : अटक वॉरंट न काढण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या जिल्हा न्यायालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. एसीबीच्या पथकाने बुधवारी छत्रपती चौकातील एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर ही कारवाई केली. अब्दुल सलीम अब्दुल जब्बार (वय 45, रा. प्रशांतनगर, धंतोली) असे अटकेतील लाचखोर शिपायाचे नाव आहे. सलीम हा सध्या न्याय मंदिरातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सहाव्या माळ्यावरील खोली क्रमांक 605 येथे कार्यरत आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा भंडाऱ्यातील खातखेड येथील रहिवासी असून, संगणक दुरुस्तीचे काम करतो. 2013 मध्ये त्याचे कामठीतील तरुणीसोबत लग्न झाले. लग्नानंतर तरुणीने तक्रारदार व त्याच्या आईविरुद्ध हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल केली. कामठी पोलिसांनी तक्रारदार व त्याच्या आईविरुद्ध हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. कामठी पोलिसांनी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. यावेळी सलीम हा कामठीत कार्यरत होता. यावेळी तक्रारदाराची सलीम याच्यासोबत ओळख झाली. काही काम असेल तर सांग मी करून देईन, असे त्याने तक्रारदाराला सांगितले. त्यानंतर सलीम याची नागपुरात बदली झाली. दरम्यान, गत काही वर्षांपासून तक्रारदाराला न्यायालयाचा समन्स अथवा वॉरंट आला नाही. याबाबत सलीम याला कळाले. सहा महिन्यांपासून सलीम हा तक्रारदाराच्या मोबाईलवर संपर्क साधून चार हजारांची मागणी करायचा. पैसे न दिल्यास तुझ्या व तुझ्या आईच्या नावे अटक वॉरंट पाठवेन, अशी धमकी देत होता. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीच्या अधीक्षक रश्‍मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संदीप जगताप, निरीक्षक गोरख कुंभार, हेडकॉन्स्टेबल सुनील कळंबे, शिपाई रविकांत डहाट, लक्ष्मण परतेकी, वकील शेख यांनी छत्रपती चौकात सापळा रचला. एका ट्रॅव्हल्सच्या कार्यालयासमोर तक्रारदाराकडून चार हजारांची लाच घेताच एसीबीच्या पथकाने सलीम याला अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com