परिवर्तनासाठी गटशेतीला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 डिसेंबर 2016

नागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची जबाबदारी मी घेतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच महापरिषदेच्या उद्‍घाटन सोहळ्यात केली. 

नागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची जबाबदारी मी घेतो, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरपंच महापरिषदेच्या उद्‍घाटन सोहळ्यात केली. 

सकाळ माध्यम समूहाच्या सहाव्या अॅग्रोवन सरपंच महापरिषदेला नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात अमाप उत्साहात रविवारी (ता. २५) सुरवात झाली. व्यासपीठावर केंद्रीय रस्ते, महामार्ग व जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी, सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, मुख्य संपादक श्रीराम पवार, फोर्स मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रदीप धाडिवाल, अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण होते. 

मुख्यमंत्र्यांनी सुरवातीलाच आयोजनाचे कौतुक केले. सरपंच महापरिषदेच्या माध्यमातून राज्यातील सरपंचांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण देणारा उत्तम उपक्रम राबविला जात असल्याबद्दल सकाळ माध्यम समूह व अॅग्रोवनचे मी कौतुक करतो. राज्याच्या ग्रामविकासात परिवर्तन घडवून आणणारा हा उपक्रम आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘राज्यात गटशेतीला चालना दिली जाईल. २० शेतकरी एकत्र आल्यास त्यांच्या गटाला सर्व योजना दिल्या जातील. या गटाने लागवडीपासून ते कापणीपर्यंत सर्व कामे करावीत, त्यासाठी लागणारी सर्व मदत राज्य शासनाकडून पुरविली जाईल. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून २० हजार गावे दुष्काळमुक्त केली जातील. अर्थात, यात ग्रामपंचायतींचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे.’’ 

राज्यात स्मार्ट व्हिलेज उपक्रम ‘सकाळ’च्या माध्यमातून राज्य सरकार राबवत आहे. ही गावे स्मार्ट करणे म्हणजे कोट, टाय घातलेली माणसं उभी करणे नसून, शाश्वत शेतीतून गावे स्वयंपूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. राज्यातील शेतकऱ्यांची समस्या ही केवळ शेतमालाच्या भावाशी निगडित नसून कमी उत्पादकता देखील आहे. उत्पादकता वाढल्याशिवाय शेतीत टाकलेल्या भांडवलाचा उपयोग होणार नाही, त्यामुळे उत्पादकतावाढीसाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यातील शेतीपंपांना दिवसा भरपूर वीज मिळण्यासाठी फीडरची जोडणी थेट सौरव्यवस्थेवर आणली जाईल. यासाठी जागतिक दर्जाच्या १६ कंपन्यांशी बोलणी सुरू आहे. राज्यात शेतकऱ्यांना सौर कृषिपंपांचे वाटप चालू आहे. मात्र, पाच लाख पंपवाटपासाठी वेळ लागेल. त्यामुळे आम्ही थेट फीडरला सौर तंत्राशी जोडून त्याच्या देखभालीची दहा वर्षांची जबाबदारी देखील याच कंपन्यांकडे सोपविणार आहोत. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे प्रस्ताव दिला असून ३ कोटी रुपये प्रतिमेगावाॅट अनुदान मिळणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

राज्यात डिजिटल तंत्राचा वापर वाढविला जात आहे. राज्यातील गावे २०१८ पर्यंत इंटरनेटने जोडली जातील. याशिवाय ३० हजार गावांमध्ये मार्चपर्यंत कॅशलेस सुविधेसाठी उपकरणे दिली जाणार आहेत. गाव आणि ग्रामपंचायतींच्या समस्यांची जाणीव सरकारला आहे. यासाठी मी स्वतः तुमच्याशी ऑडिओ ब्रिजच्या माध्यमातून बोलणार आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी सरपंचांना दिला. 

यशाचे अनुकरण केल्यास गाव बदलेल : नितीन गडकरी 
सरपंच हे मानाचे, राजकीय पद नाही, तर तो गावाच्या विकासाच्या इंजिनाचा चालक आहे. चांगल्या सरपंचांमुळे गाव आदर्श होईल. याबाबतची प्रेरणा अॅग्रोवनच्या या सरपंच महापरिषदेतून मिळेल, असे नमूद करीत केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले,

‘‘गावातील प्रत्येकाशी उत्तम संबंध असेल तर ग्रामविकासाचे इंजिन पुढे नेणे शक्‍य होईल. कृषी व ग्रामीण भागातील संशोधन लोकांपर्यंत पोचविण्याचे काम अॅग्रोवनच्या माध्यमातून होत असून, ग्रामीण भागात कौशल्य कमी नसल्याचे अहमदाबाद येथील इंडिया इनोव्हेशन फाउंडेशनमधील २० हजार संशोधकांनी दाखवून दिले आहे.’’ येथे ग्रामस्थ संशोधन करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. एखाद्या यशाचे अनुकरण करणे चुकीचे नाही. यशस्वितेचे अनुकरण केल्यास गाव बदलेल. गावातील नाल्यांचे खोलीकरण करून त्यावर बंधारे बांधल्यास गावातील शेतीत चांगले परिणाम येतील. पाण्याशिवाय शेती शक्‍य नसून गावातील जलसाठा वाढविण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. खोलीकरण केल्यास पाण्याची क्षमता पाच पटीने वाढणार असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्यात शेतीतील काहीही जाळणार नाही, अशी शपथच शेतकऱ्यांनी घेऊन यातून खतनिर्मिती करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ठिबक सिंचनावर भर द्यावा, असा सल्लाही सरपंच, शेतकऱ्यांना दिला. गावात जेवढी माणसे तेवढी झाडे व पशू असले पाहिजेत. गावे समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, केवळ सरकार व परमेश्‍वरावर अवलंबून राहू नका, असा कानमंत्रही त्यांनी दिला. 

सरपंच महापरिषदेत सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी आभार मानले. फोर्स मोटर्स प्रस्तुत अॅग्रोवन सरपंच महापरिषदेचे दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स, सिंटेक्स इंडस्ट्रिज, अॅग्रोस्टार हे प्रायोजक असून, महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण (मेडा), राज्य कृषी विभाग, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, जलसंधारण विभाग आणि रोजगार हमी योजन हे सहयोगी अाहेत. 

प्रत्येक गावात हवामान केंद्र 
शेतकऱ्यांना हवामानातील बदलाची अचूक माहिती वेळेवर मिळावी, यासाठी प्रत्येक गावात हवामान माहिती केंद्र उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना त्यांच्या गावात एलईडी वॉलद्वारे हवामानातील बदलांचे अपडेट्स मिळतील, असेही ते म्हणाले. 

हायवेच्या धरतीवर ‘आय-वे’ 
रस्ते प्राधिकरणातर्फे राज्यभरात महामार्गांचे जाळे विस्तारले जात आहे. त्या धर्तीवर याच महामार्गांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन इंटरनेटचे जाळे (आय-वे) विस्तारणार आहे. याद्वारे २०१८ पर्यंत राज्यातील २९ हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडले जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले. प्राथमिक आरोग्य केंद्रांना सुद्धा मुंबईतील जेजे रुग्णालयाशी जोडून ग्रामीण भागातील रुग्णांवर आनलाइन उपचार करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. 

पुलाखाली बंधारा 
महाराष्ट्रात सिंचनाचे प्रमाण केवळ १८ टक्के असून, इतर राज्यांच्या तुलनेत हे फारच कमी आहे. जोपर्यंत सिंचन ५५ ते ६० टक्क्यांवर पोचत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र समृद्ध होणार नाही. महामार्गाचे जाळे विस्तारताना व पुलांचे बांधकाम करताना पुलाखाली बंधारा तयार केला जाईल. त्यावर वाॅटर गेटदेखील लावले जाईल. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही. या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीवर मात करीत सिंचनक्षमता वाढविता येईल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. 

कृषी विद्यापीठांपेक्षा ‘अॅग्रोवन’ अधिक मार्गदर्शक 
राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये केवळ कागदावरच संशोधन होते. ते प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे ही विद्यापीठे शेतकऱ्यांसाठी पांढरे हत्ती ठरतात. यापेक्षा सकाळ-ॲग्रोवन शेतकऱ्यांच्या यशोगाथा आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांपेक्षा एग्रोवनच शेतकऱ्यांसाठी अधिक मार्गदर्शक ठरत आहे, असेही नितीन गडकरी म्हणाले. 

सरपंच महापरिषदेला शुभेच्छा 
अॅग्रोवनने विदर्भात सरपंच महापरिषदेचे आयोजन करून प्रथमच विदर्भातील ग्रामविकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला. पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरपंच हा ग्रामविकासाचा महत्त्वाचा दुवा असून, त्रिस्तरीय यंत्रणेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. गावाच्या सर्वांगीण विकासावरच देशाचा विकास अवलंबून आहे. ग्रामीण भागातील एेंशी टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून असल्याने ग्रामविकासामध्ये शेती आणि शेतकऱ्याच्या विकासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अॅग्रोवन सरपंच महापरिषदेत सरपंचांना शेती व शेतीपूरक विकासाचे मार्गदर्शन मिळेल. त्याचा लाभ घेऊन गावाच्या विकासाच्या वाटचालीमध्ये या ज्ञनाचा उपयोग करतील. या कार्यामध्ये कृषी विभाग संपूर्णपणे आपल्यासोबत असून, या विभागाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे मी आवाहन करतो. अॅग्रोवन सरपंच महापरिषदेकरिता आलेल्या सर्व सरपंचांना भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी व ग्रामविकासासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. 
- पांडुरंग फुंडकर, कृषिमंत्री, महाराष्ट्र राज्य

Web Title: CM Devendra Fadnavis supports Group Farming in Sarpanch Mahaparishad