#NagpurWinterSession : मुख्यमंत्री महोदय, हे शिवाजी पार्क नाही (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

हे सरकार तीनचाकी सरकार आहे. काही बोलण्याआधी मुख्यमंत्र्यांना आजूबाजूला बघावे लागते. त्यामुळे ते केवळ एकमेकांना सोईचे ठरेल एवढेच बोलतात. यामुळे महत्त्वाचे मुद्दे मागे पडत आहे.

नागपूर : राज्यपालांच्या अभिभाषणावर निवेदन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कसारखे भाषण केले. त्यांच्या भाणातून आमच्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आमचा अपेक्षाभंग झालेला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

सोमवारपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात पहिल्या दिवसापासून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामाना बघायला मिळत आहे. दररोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मात्र, चौथा दिवस यात विशेष ठरला. राज्यापालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोध बाकावरील सदस्यांनी राज्य सरकारवर अनेक प्रकारचे आरोप केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारूड सादर करून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. तोच धागा पकडत गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना संत ज्ञानेश्‍वरांच्या अभंगाचा वापर करून उत्तर दिले. 

हेही वाचा - 'अच्छे दिन येईचि ना...' विरोधकांच्या भारूडाला अभंगाने उत्तर  

मुख्यमंत्र्यांच्या अभिभाषणावर फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे हे सभागृहातील पहिलेच निवेदन होते. त्यांनी केलेल्या भाषणातून आम्हाला एकही उत्तर मिळाले नाही. मुख्यमंत्री शिवसेनेच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्यात भाषण देतात त्याप्रमाणेच बोलले. त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्याला थेट बगल दिली. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्याचे आश्‍वासन नव्हे वचनच त्यांनी सरकार स्थापन होण्याआधी दिले होते. आज मात्र त्यांनी याचा साधा उल्लेखही केला नाही. त्यामुळे आजचा दिवस शेतकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडले नाही. नागपुरात अधिवेशन सुरू असून विदर्भातील विविध विषयावर चर्चा करण्यात या सरकारला रस नाही. 

खुर्ची वाचविण्यात व्यस्त

हे सरकार तीनचाकी सरकार आहे. काही बोलण्याआधी मुख्यमंत्र्यांना आजूबाजूला बघावे लागते. त्यामुळे ते केवळ एकमेकांना सोईचे ठरेल एवढेच बोलतात. यामुळे महत्त्वाचे मुद्दे मागे पडत आहे. एखादा मुद्दा दुसऱ्या पक्षाला अडचणीचा ठरल्यास अडचण होऊ शकते. त्यामुळे मुख्यमंत्री खुर्ची वाचवण्यातच व्यस्त आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

विरोधकांनी केला सभात्याग

हे सरकार स्वत:चे वचन विसरले असून, शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या निवेदनावर समाधान झाले नसल्याने विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात नारेबाजी करून सभात्याग केला. 

क्लिक करा - एकनाथ खडसे यांनी घेतली पवारांची भेट?

बुलेट ट्रेन नाही तर तीनचाकी गोरगरिबांच्या आवाक्‍यात

देवेंद्र फडणवीस यांनी हे तीनचाकी सरकार असून राजकीय स्वार्थासाठी एकत्र आलेले सरकार असल्याची टीका बुधवारी सभागृहात केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी आमचे सरकार गोरगरिबांचे असून आम्ही भूमिपुत्रांसाठी काम करणार आहोत. त्यांच्या भल्यासाठी आम्ही बांधील आहोत. गोरगरिबांना केवळ तीनचाकी रिक्षाच परवडते, बुलेट ट्रेन त्यांच्या आवाक्‍यात येत नसल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

आमचे सरकार बोलण्याऐवजी कृती करणारे

राज्यपालांनी केले अभिभाषण लहान निश्‍चितच आहे. मात्र, आमचे सरकार कमी बोलणारे असून कृतीवर भर देणारे आहे. हे स्थगितीचे नाही, तर प्रगतीचे सरकार आहे. स्थगितीच्या जीआरमध्ये काही त्रुटी असतील तर दुरुस्ती करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधकांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत द्या, अशी घोषणाबाजी करीत सभात्याग केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM thakrey's speech like shivaji park programme, says fadanvis