एकनाथ खडसे यांनी घेतली पवारांची भेट? 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 December 2019

मंगळवारी सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गोटातील काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला होता.

नागपूर : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लवकरच भाजपला रामराम करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपासून चर्चेत आहे. राषट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पाठोपाठ ते मंगळवारी नागपुरात दाखल झाले होते. त्यांनी गुरुवारी पहाटे शरद पवार यांची अर्धा तास भेट घेतल्याचे समजते. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यास राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडेल. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मंगळवारी दुपारी नागपुरात आगमन झाले. त्यापूर्वीच एकनाथ खडसे दुपारी 3.30 वाजता नागपुरात दाखल झाले होते. ते हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे थांबले होते. विधानसभेत धक्काबुक्की करणाऱ्या भाजप आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बुधवारी अनुशासन आणि शिस्तीचे धडे दिले. बुधवारी भल्या सकाळी भाजपच्या दोन्ही सभागृहातील आमदारांनी रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात झालेल्या बौद्धिक वर्गाला हजेरी लावली होती. त्यामुळे संघाने नेमके बौद्धिक धडे दिले की, तंबी याबाबत विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या वर्गाला पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दांडी मारली. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. 

हेही वाचा - पवार साहेब, फडणवीसांचे सरकार घालविल्याबद्दल अभिनंदन

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र नागपूरतर्फे मंगळवारी सिव्हिल लाइन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रतिभाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात खडसे यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचा अंदाज राष्ट्रवादीच्या गोटातील काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखविला होता. काहींच्या मते एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघात 20 डिसेंबरला त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे सध्या माझा कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय झाला नाही, असे एकनाथ खडसे यांनी सामला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. 

क्लिक करा - 'कीचड करून कमल खिलवने', बरं नव्हं

मी नाराज नाही!

भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्यांशी अनेक नेते संपर्क साधण्याच्या प्रयत्नात आहेत. मी ही संपर्क करणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले होते. यावर खडसेंनी प्रतिक्रिया व्यक्‍त करताना, मी नाराज नाही. मी भाजपातच राहणार असल्याचे बोलले होते. मात्र, त्यांनी पवारांची भेट घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. 

कार्यालयावरील बॅनर काढले

नागपुरात एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. यानंतर ते देहरादूनला गेल्याची माहिती आहे. दुसरीकडे त्यांच्या कार्यालयावरील भाजपचे बॅनर निघाल्याचे दिसून आले. यामुळे ते राष्ट्रवादीत लवकरच प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sharad Pawar and Eknath Khadse meet?