मुख्यमंत्र्यांचा ड्रीमप्रोजेक्ट टेलिमेडिसीन टाळेबंद | Telemedicine | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेलिमेडिसीन

मुख्यमंत्र्यांचा ड्रीमप्रोजेक्ट टेलिमेडिसीन टाळेबंद

अचलपूर (जि. अमरावती) : टेलिमेडिसीन (Telemedicine) हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत (Deepak sawant) यांनी पदभार सांभाळताच टेलिमेडिसीनला प्राधान्य दिले होते. मात्र याच ड्रीम प्रोजेक्टला आता टाळे लागले आहे. टेलिमेडिसीन सेवेच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून गंभीर आजार किंवा तातडीच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, याबाबतचा सल्ला घेऊन रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यास मदत होते. मात्र मेळघाटात टेलिमेडिसीन सेवा सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच ती बंद पडली आहे.

राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री यांनी मेळघाटातील सेमाडोह आणि हरिसाल येथे टेलिमेडिसीन सेवेचा शुभारंभ केला होता. मात्र अल्पावधीतच ही सेवा कुचकामी ठरली आहे. या टेलिमेडिसीनच्या माध्यमातून गंभीर आजार किंवा तातडीची तथा गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णांवर कोणते व कसे औषधोपचार करावेत, यासंदर्भात थेट मुंबई, पुणे व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णांवर उपचार करणे सोईस्कर होत होते.

हेही वाचा: वीज वापराच्या नावाखाली 12 हजार कोटींचा भ्रष्टाचार : प्रताप होगाडे

मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून निर्माण केलेली टेलिमेडिसीन सेवा मेळघाटात सध्या बंद पडल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांना टेलिमेडिसीनच्या माध्यमातून सल्ला घेऊन गंभीर आजारांवर उपचार करण्यास अडचण निर्माण झाली आहे. परिणामी उपचार न करता केवळ रुग्णांना रेफर करण्यातच ते धन्यता मानत आहेत.

जागेवरच औषधोपचार करण्यास मदत

एखाद्यावेळी आजारावरील उपचारासंबंधी किचकट प्रश्न निर्माण होतो. अशावेळी रुग्णांना नागपूर, मुंबई किंवा पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात येते. या पार्श्वभूमीवर नव्या संगणकीय तंत्रज्ञानाद्वारे ही सुविधा विकसित केली आहे. त्यात टेलिमेडिसीन सुविधेद्वारे जगभरातील तज्ज्ञांशी संपर्क साधून संबंधित रुग्णांवर काय औषधोपचार करावेत, याबाबत सल्ला घेणे शक्य आहे. संबंधित रुग्णांच्या आजारांची इत्थंभूत माहिती टेलिमेडिसीन यंत्रणेद्वारे तज्ज्ञांना दिल्यास, ते तत्काळ संबंधित रुग्णांच्या औषधोपचाराविषयी मार्गदर्शन करतात. परिणामी रुग्णांना इतर ठिकाणी रेफर न करता जागेवरच औषधोपचार करण्यास मदत होते.

हेही वाचा: कऱ्हाड : मेव्हण्याला खुनाच्या कटात अडकवण्यासाठी प्रेयसीचा खून

टेलिमेडिसीन केंद्राचे ज्या कंपनीला काम दिले होते, त्या कंपनीमुळे आज मेळघाटातील दोन ठिकाणची टेलिमेडिसीन सेवा बंद आहे.

- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Uddhav Thackerayvidarbha
loading image
go to top