Video : घोटाळे असतील तर कामे थांबवायची नाही का? : मुख्यमंत्री 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 15 December 2019

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकारच्या पहिल्याच अधिवेशनासाठी मुख्यमंत्री रविवारी नागपूरला पोहोचले. तत्पूर्वी फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा "स्थगिती सरकार' असा उल्लेख केला होता. यास प्रत्त्युतर देताना ठाकरे यांनी नुसते आरोप केले जात आहेत, कुठला प्रकल्प थांबवला ते सांगावे, त्याची यादी सादर करावी असे आवाहनच विरोधकांना दिले.

नागपूर : मागील सरकारने मंजूर केलेले प्रकल्प आणि विकासकामांमध्ये घोटाळे असतील तर ते तसेच सुरू ठेवायचे का? असा सवाल उपस्थित करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडचा अपवाद वगळता एकाही कामाला ब्रेक लावला नसल्याचे स्प्ष्ट केले. 

महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर सरकारच्या पहिल्याच अधिवेशनासाठी मुख्यमंत्री रविवारी नागपूरला पोहोचले. तत्पूर्वी फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीचा "स्थगिती सरकार' असा उल्लेख केला होता. यास प्रत्त्युतर देताना ठाकरे यांनी नुसते आरोप केले जात आहेत, कुठला प्रकल्प थांबवला ते सांगावे, त्याची यादी सादर करावी असे आवाहनच विरोधकांना दिले. मेट्रोसाठी आरे येथील मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान झाले. लोकांचाही याला प्रचंड विरोध होता. त्यामुळे कारशेड हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यास स्थगिती देण्यात आलेली नाही, असे सांगितले.

महत्त्वाची बातमी -  सावरकरांचा अपमान करण्याऱ्यांसोबत चहापान नाही

छत्रपती राज्याचे दैवत 
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलल्या जात आहे, या प्रश्‍नावर ठाकरे यांनी याची सविस्तर चौकशी केली जाईल. या प्रकरणात जो दोषी असेल त्याला निश्‍चितच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाईल, असे सांगितले. मात्र, यामुळे स्मारकाचे काम थांबवण्यात येणार नाही. छत्रपती राज्याचे दैवत आहेत. त्यांचे भव्यदिव्य आणि सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक उभे केले जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. 

सविस्तर वाचा - शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस यापुढे सोबतच : उद्धव ठाकरे

अद्याप तिजोरी उघडली नाही 
नुकतीच आमच्याकडे राज्याच्या तिजोरीची चावी आली आहे. ती अद्याप उघडली नाही. त्यात किती रक्कम आहे हे आम्ही सांगणारच आहोत. आमच्यासाठी महिलांची सुरक्षा, शेतकरी, बेरोजगारी असे अनेक प्रश्‍न आहेत. जनतेला दिलेली वचने नक्कीच पूर्ण केले जातील. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि नुकसान भरपाई दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. 

सरकार पाच वर्षांचे 
हिवाळी अधिवेशन फक्त सहा दिवसांचे असले तरी सरकारचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. विरोधकांनी उपस्थित केलेले आणि जनतेच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे आम्ही कृतीतून देऊ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM uddhav thakrey addresed press conferance at nagpur