esakal | खुर्चीसाठी प्रवास 'खर्च'; स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी पोलिस निरीक्षकांत रंगणार शीतयुद्ध
sakal

बोलून बातमी शोधा

cold war between police inspector for local crime branch in chandrapur

आता स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी बाळासाहेब खाडे यांना मिळाली आहे. परंतु, याच पदावर आणखी काही पोलिस निरीक्षकाचा डोळा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी पोलिस निरीक्षकांत चांगले शीतयुद्ध रंगणार आहे. 

खुर्चीसाठी प्रवास 'खर्च'; स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी पोलिस निरीक्षकांत रंगणार शीतयुद्ध

sakal_logo
By
प्रमोद काकडे

चंद्रपूर : ठाणेदारांच्या जिल्हातंर्गत बदल्यांमध्ये मोठा 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाल्याने वादग्रस्त अधिकाऱ्यांची महत्त्वांच्या जागी वर्णी लागली, अशी चर्चा आता पोलिस वर्तुळात रंगली आहे. दारूबंदीमुळे काही विशिष्ट शाखा आणि पोलिस ठाण्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बदली होऊन गेलेले अधिकारीही  'लॉबिंग' करून चंद्रपुरात परतले. आता स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी बाळासाहेब खाडे यांना मिळाली आहे. परंतु, याच पदावर आणखी काही पोलिस निरीक्षकाचा डोळा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी पोलिस निरीक्षकांत चांगले शीतयुद्ध रंगणार आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या पार्श्‍वभूमीवर काही महिन्यांपूर्वी रीतसर बैठका घेऊन अवैध दारूविक्रीचे अलिखित परवानेच वाटण्यात आले. पोलिस, राजकीय नेत्यांचा वाटाही यात ठरविण्यात आला. सर्वकाही सुरळीत सुरू होते. तत्पूर्वीच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांची बदली झाली. त्यानंतर अरविंद साळवे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांचा कार्यभार सांभाळला. साळवे यांनी जिल्ह्यातील दारूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी चार विशेष पथक स्थापन केले. या पथकाचे पुढे काय झाले, हे आता सावळेच सांगू शकतील. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकोटे यांचा बदली कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांची बदली होणार, हे गृहीत धरूनच या पदासाठी काहींनी राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले. यात ब्रह्मपुरीचे ठाणेदार खाडे यांनी बाजी मारली.  ब्रह्मपुरीचे ठाणेदार असलेले खाडे आधी बल्लापुरात जायला इच्छुक होते. परंतु, त्यांची पोलिस दलातील 'दैदीप्यमान' कारकीर्द बघता स्थानिक आमदारांनी त्यांना 'रेड सिग्नल' दाखविला. शेवटी खाडे यांना चंद्रपूरचा प्रवास "खर्च' परवडला आणि ते येथे आले. 

हेही वाचा - 'जय-विरू'चं अनोख प्रेम! एक बैल हातपंपावर पाणी हापसतो, तर दुसरा पितो

दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूपुरवठ्याची अघोषित जबाबदारी वणी येथील दारू व्यावसायिकांनी घेतली आहे. घुग्घुसमार्गे चंद्रपुरात दारू येते. हे आता पोलिसही नाकारत नाही. याच घुग्घुसचे कधीकाळी सुधाकर अंभोरे ठाणेदार होते. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचाही भार सांभाळला आहे. दारूबंदीत घुग्घुसचे महत्त्व आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जबाबदारीची त्यांना चांगलीच "जाणीव' आहे. ते दोन वर्षांपूर्वीच नागपूर ग्रामीण पोलिस दलात बदली होऊन गेले. मात्र, तिथेही असतानाही त्यांचा चंद्रपूरसाठी जीव तुटत होता. अंभोरेही यांनीही शेवटी नागपूर-चंद्रपूरचा मार्ग मिळाला आणि ते आले.

हेही वाचा - मतलब निकल गया तो पहचानते नहीं...! भाड्याचे पैसे मागताच मनपाने ॲम्बुलन्स केल्या बंद

तत्पूर्वीच खाडे यांनी रात्री 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखाची खुर्ची ताब्यात घेतली. त्यामुळे आता अंभोरे "वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यांना जिल्ह्यातील दारू व्यावसायिकांची खडानखडा माहिती आहे. या ओळखीचा भविष्यात वरिष्ठ अधिकारी "उपयोग' करून घेता येईल, अशी आशा अंभोरे यांना आहे. पवनीतून ब्रह्मपुरीमार्गे दारूचा पुरवठा होतो. त्यामुळे दारूबंदीसाठी ब्रह्मपुरी महत्त्वाचे जंक्‍शन आहे. इथेच खाडे होते. आता त्यांच्या जागेवर नागपूर पोलिस  (ग्रामीण) मलिक्कार्जुन इंगळे यांची वर्णी लागली. इंगळे दोन वर्षांपूर्वी सिंदेवाहीत ठाणेदार होते. त्यांनाही या जिल्ह्यातील ठाणेंच्या 'महत्त्व' माहिती आहे. त्यामुळे इंगळेही नेहमीच चंद्रपूरच्या आठवणीने व्याकूळ व्हायचे. अखेर त्यांनी बरेच 'परिश्रम' करून ब्रह्मपुरी गाठलेच. 

हेही वाचा - चोरट्यांच्या मनात भरली ‘मोसंबी’; चक्क शेतातून चार टन मोसंबीची चोरी

दरम्यान, या बदल्यांच्या पार्श्‍वभूमीवर आता मोहल्ला कमिट्यांचीही फेररचना होणार आहे. दारूच्या पेटीची किंमत रक्कम आणि कमिशन वाढविण्यात आले. येणाऱ्या काही दिवसात अवैध दारूतस्कारांच्या मुसक्‍या आवळण्याचे सोपस्कार पार पाडले जाईल. त्यानंतर सर्व सुरळीत होईल, अशी शक्‍यताही पोलिस दलातील असंतुष्ट आत्म्यांनी वर्तविली आहे.

loading image
go to top