नववर्षाचे स्वागत थऽ थऽऽ थंडीने

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 डिसेंबर 2019

अकोलेकर गोठविणारी थंडी अनुभवणार आहे. हवामान तज्ज्ञांनी असे संकेत दिले आहे.  आता डिसेंबर अखेर हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे.

अकोला : यंदा नववर्षाची सुरुवात थऽ थऽऽ थंडीने होणार असून, दोन आठवड्यांमध्ये घोठवणाऱ्या थंडीचा अनुभव अकोलेकरांना येणार आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर का होईना, तीन दिवसांपासून कुडकुडणाऱ्या आणि बोचऱ्या थंडीचा अनुभव अकोलेकरांना येत असून, पुढील काही दिवसात पारा पाच अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

गेल्या काही वर्षांपासून प्रत्येक ऋतू हा अकोल्याला एक नवी ओळख देऊन जात आहे. कधी उन्हाळ्यात 49 अंश सेल्सिअस तापमानाचा तडाखा तर, कधी आखूड आणि लांबलेला पावसाळा अकोलेकरांनी अनुभवला आहे. यावर्षी सुद्धा ऋतूचक्रातील बदलाचा असाच अनुभव घेत, सप्टेंबरमध्ये तीव्र उन्हाचे चटके, आक्टोबर अखेरपर्यंत झोडपून काढणारा पाऊस आणि आता डिसेंबर अखेर हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचा सामना करावा लागणार आहे. 

हेही वाचा - नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ अकोल्यात रॅली

8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
महिनाभरापासून जिल्ह्यात हवामान बदलामुळे ढगाळलेले आणि गर्मीचे वातावरण होते. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसांपासून तापमानात अचानक घसरण झाली असून, रविवारी (ता.29) किमान 8.6 आणि कमाल 24.4 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसात तापमानात अजून घसरण होऊन पारा पाच ते सहा अंशाखाली जाण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

हेही वाचा - ...अन् निष्ठावंतांची निष्ठा खुंटीला

पुढील दोन आठवडे विदर्भात शीत लहर
काश्मिर, उत्तर भारतात मोठा प्रमाणात बर्फवृष्टी होत असून, महाराष्ट्रात शीत वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे तीन ते चार दिवसांपासून वऱ्हाडासह विदर्भात किमान तापमान घसरले आहे. पारा पाच ते आठ अंशावर आला आहे. नववर्षाची सुरवात यंदा कुडकुडणाऱ्या थंडीनेच होणार असून, पुढील दोन आठवडे अकोल्यासह विदर्भात शीत लहर राहू शकते.
-संजय अप्तूरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

अशी घ्या काळजी
* नित्य व्यायाम करावा
* आहारात पालेभाज्या, फळे, दूध व मोड आलेले कडधाण्य घ्यावे
* शिळे तसेच उघड्यावरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे
* हात स्वच्छ धुवावे
* गर्द रंगाचे व गरम कपडे घालावी
* अती शीत पदार्थ खाणे टाळावे
* संसर्गजन्य आजार बाधीत रुग्णांचे कपडे, टॉवेल वापरू नये
* वृद्ध, लहान बालके व रुग्णांनी रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cold wave in Welcome to the New Year