महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंदच, कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने निर्णय

सकाळ वृत्तसेवा
Monday, 15 February 2021

एक फेब्रुवारीपासून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (ता.13) पॉझिटिव्ह रुग्णांचा आकड्याने शंभरी ओलांडली. एकाच दिवसात 129 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

यवतमाळ : केंद्र व राज्य शासनाने कोरोना मार्गदर्शन सूचनांचे पालन करीत सर्व महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्या अनुषंगाने तयारी सुरू झाली होती. जिल्ह्यात एक फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार असून पूर्वीप्रमाणे ऑनलाइन वर्ग घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुरुवारी (ता.11) दिले आहेत.

हेही वाचा - मुलांनो, आम्हाला माफ करा; आमचे मृतदेह मेडिकल कॉलेजला दान करा’ अशी चिठ्ठी लिहून दाम्पत्याची...

राज्य शासनाने 'मिशन बिगीन अगेन' सुरू केले आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने नियमात सूट दिली जात आहे. बाजारपेठा पूर्ववत वेळेनुसार सध्या सुरू आहेत. शाळाही सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर सोमवारी (ता. 15) फेब्रुवारीपासून अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहायित विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालयातील नियमित वर्ग कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालक करून सुरू करण्याच्या सूचना होत्या. त्यामुळे महाविद्यालयस्तरावर तयारी सुरू झाली होती.

हेही वाचा - जेवणासाठी बाहेर गेलेल्या मुलाची २८ दिवासांनी फक्त मिळाली कवटी; टी-शर्ट बघताच आईने फोडला हंबरडा

जिल्ह्यात एक फेब्रुवारीपासून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शनिवारी (ता.13) पॉझिटिव्ह रुग्णांचा आकड्याने शंभरी ओलांडली. एकाच दिवसात 129 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्वीप्रमाणे ऑनलाइन वर्ग सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे. परिणामी, 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयात प्रत्यक्ष शिकवणी बंद असणार आहे. यानंतरही कोरोना विषाणूसंदर्भातील परिस्थितीचा विचार करूनच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये ही प्रत्यक्ष उघडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने तूर्तास तरी प्रत्यक्ष महाविद्यालय उघडली जाणार नाहीत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: colleges closed till 28 february due to corona cases increases in yavatmal