एसटीच्या संपात खासगी वाहतुकीने ‘दिलासा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी वाहनात बसताना प्रवासी.

एसटीच्या संपात खासगी वाहतुकीने ‘दिलासा’

sakal_logo
By
रवींद्र शिंदे

यवतमाळ : या महिन्याच्या सुरुवातीलाच आलेल्या दिवाळीच्या दुसर्‍या दिवसापासून एसटी कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन पुकारले. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या 21 दिवसांपासून हा संप सुरू आहे. त्यामुळे दररोज एसटीने प्रवास करणार्‍या 50 ते 60 हजार प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. मात्र, अशा या बिकटस्थितीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आल्याने प्रवाशांना मोठा ‘दिलासा’ मिळाला आहे.

एसटी महामंडळाचे यवतमाळ जिल्ह्यात एकूण नऊ आगार आहेत. यवतमाळ, पुसद, दारव्हा, उमरखेड, दिग्रस, नेर, राळेगाव, पांढरकवडा व वणी या नऊ आगारांचा त्यात समावेश आहे. या आगाराअंतर्गत बसचालक, वाहक, तांत्रिक आदी साडेतीन हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या नऊ आगारांमधून दररोज 430 बसगाड्यांच्या दोन हजार 100 फेर्‍या व्हायच्या. त्यामधून दिवसाला प्रवास करणार्‍यांची संख्या 50 ते 60 हजार असायची. मात्र, गेल्या 21 दिवसांपासून एसटी कर्मचार्‍यांनी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी देणार्‍या ‘लालपरी’ची चाके आगारातच थांबली आहेत. त्यामुळे नेहमीच वर्दळ राहणार्‍या बसस्थानकात सध्या शुकशुकाट दिसून येत आहे.

हेही वाचा: ओड समाजाच्या मागण्या विधिमंडळात मांडू : आमदार हंबर्डे

दिवाळीच्या दुसर्‍या दिवसापासून एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांना सुरुवातीचे काही दिवस अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, राज्य शासनाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी खासगी वाहनधारकांना परवानगी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील 40 ते 50 हजार प्रवाशांना खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहनांचा दिलासा मिळाला आहे. यवतमाळ येथून जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर जाणार्‍या प्रवाशांसाठी खासगी वाहनधारकांनी चार ते पाच ठिकाणी प्रमुख थांबे ठेवली आहेत. संविधान चौक, दारव्हा रोड, धामणगाव रोड, पांढरकवडा रोड, आर्णी रोड, घाटंजी रोड, कळंब चौक आदी ठिकाणी प्रवाशांसाठी वाहने उभी केली जात आहेत.

खासगी वाहनात बसताना प्रवासी.

खासगी वाहनात बसताना प्रवासी.

"एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपामुळे सुरुवातीचे काही दिवस प्रवाशांची गैरसोय निश्‍चितपणे झाली. मात्र, त्यानंतर पूर्णपणे खासगी वाहनांतून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आम्हीदेखील प्रवाशांना सुखकर प्रवास करता यावा, यासाठी नियोजन केले. यवतमाळ येथून धामणगावला जाणार्‍या प्रवाशांसाठी यवतमाळ ते धामणगाव अशी पुरेशा वाहनांची व्यवस्था केली आहे."

- प्रशांत लांजेवार, खासगी वाहन चालक-मालक, यवतमाळ.

"एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे खासगी वाहनांमधूनच केली जात आहे. म्हणून आमचीही जबाबदारी वाढली आहे. आम्हीदेखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याची पूर्णपणे खबरदारी घेत आहोत. विशेष म्हणजे या परिस्थितीत कोणत्याही प्रकारची भाडेवाढ आम्ही केलेली नाही."

- नीलेश राठोड, खासगी वाहन मालक- चालक, तिवसा.

"दिवाळीतच एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने सुरुवातीला खूप हाल झाले. मात्र, शासनाने खासगी वाहनधारकांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिल्याने प्रवाशांना मोठा आधार व दिलासा मिळाला आहे."

- योगेश धलवार, प्रवासी, धामणगाव.

loading image
go to top