व्यापारी संघटना जीएसटीबद्दल देशभर जनजागृती करणार

वृत्तसंस्था
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

नागपूर- प्रस्तावित वस्तू व सेवाकराच्या तरतुदी जिल्हा आणि ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी अखिल भारतीय किरकोळ व्यापारी महासंघातर्फे (कॅट) देशभरात पाच हजार व्यापाऱ्यांना प्रशिक्षित करण्याचा निर्णय राष्ट्रीय परिषदेत घेण्यात आला आहे. जीएसटीत तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, व्यापाऱ्यांनी आपल्या विद्यमान व्यवसायात काय बदल करावेत यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.

जीएसटी तंत्रज्ञानावर आधारीत एक कर प्रणाली आहे. भविष्यात देशातील व्यापाराच्या पद्धतीत यामुळे मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. त्यानुसार व्यापाऱ्यांना जीएसटीची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे. अन्यथा जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागेल. हे ओळखून हा निर्णय घेण्यात आल्याचे कॅटचे अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी स्पष्ट केले.

जीएसटीबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारने व्यापाऱ्यांना विश्‍वासात घेतलेले नाही. यामुळे नाराजीचा सूर असून सरकारने तातडीने व्यापाऱ्यांशी चर्चा करण्याची गरज आहे. जीएसटी ई-कर प्रणाली असून आधीच्या कागदी प्रणालीपेक्षा वेगळी आहे. देशभरातील 70 टक्के व्यापारी अजूनही संगणकाचा वापर करीत नाही. या स्थितीत जीएसटी प्रणाली कशी लागू करणार, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.

कॅट अकाऊंट सॉफ्टवेअर टॅली सोल्युशन्स लिमिटेडच्या मदतीने जीएसटीची माहिती देण्यासाठी देशभर अभियान चालविण्यात येणार आहे. यातून व्यापाऱ्यांनी जीएसटी तंत्रज्ञानाबद्दल सोप्या भाषेत माहिती देण्यात येणार आहे, असे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.

Web Title: Commercial organizations will raise awareness about GST