तीन दिवसांत पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करा : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

गोंदिया : गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शनिवारी (ता. 2) गोरेगाव, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव तालुक्‍यात पीक नुकसानाची पाहणी करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. तलाठी, कृषी सहायक व ग्रामविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे तीन दिवसांत पंचनामे पूर्ण करावे, असेही निर्देश दिले.

गोंदिया : गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील उभी पिके व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्वच महसूल मंडळातील 33 टक्‍के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांचे गावनिहाय अचूकपणे पंचनामे करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे नाव, पदनाम, भ्रमणध्वनी क्रमांक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी या वेळी दिल्या. तसेच उपस्थित विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पीकविमा काढलेल्या व पीकविम्याकरिता अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसानाचे दावे लवकरात लवकर काढण्याचे निर्देश दिले.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्र पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नायनवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे, गोरेगावचे तहसीलदार शेखर पुनसे, अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम, संबंधित तालुका कृषी अधिकारी, तलाठी, कृषिसेवक, सरपंच व सदस्य तसेच विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत झालेल्या पंचनाम्यांची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांकडून घेतली. त्याचबरोबर पंचनामे करताना येणारे अडथळे जाणून घेतले. उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून शासकीय मदतीसंबंधीची कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. शेतपिकांची पाहणी करून पंचनामे तीन दिवसांत अचूकपणे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना केल्या.
उपजिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती
पीक नुकसानाबाबतची कार्यवाही सुरळीत पार पाडण्यासाठी तालुकानिहाय उपजिल्हाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या पिकांच्या नुकसानाचे पंचनामे न झाल्यास याबाबतची माहिती तलाठी, कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी किंवा तहसीलदार यांना कळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बलकवडे यांनी केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complete the crop loss plan in three days: The Collector