अंगठा लावण्याचे प्रकरण चिघळणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

नागपूर - मेडिकल व मेयोमध्ये वरिष्ठ डॉक्‍टरांना बायोमेट्रिक पंचिंग सक्तीचे आहे. निवासी डॉक्‍टरांना बायोमेट्रिकचा नियम नव्हता. परंतु, नुकतेच निवासी डॉक्‍टरांनाही बायोमेट्रिकवरील हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय शासनाने घेतला. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नियम लागू झाला. मेयोतही या नियमाची अंमलबजावणी होते. मात्र मेडिकलमधील निवासी डॉक्‍टरांनी बायोमॅट्रिकला नकार दर्शविल्याने प्रकरण चिघळणार आहे. 

अनेकदा गंभीर रुग्ण मेडिकल, मेयो तसेच सुपरमध्ये आल्यानंतर डॉक्‍टर उपलब्ध नसतात. यावर मात करण्यासाठी राज्यभरात बायोमेट्रिक प्रणाली सुरू करून सेवेतील निवासी डॉक्‍टरांना हा नियम लावण्यात आला. निवासी डॉक्‍टरांच्या मार्ड संघटनेने (मार्ड) याला विरोध दर्शविला. त्यामुळे मेडिकल प्रशासन विरुद्ध मार्ड असा पेच निर्माण झाला. मार्ड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांची आज (ता. २८) भेट घेऊन बायोमेट्रिकविरोधात पत्र दिले. परंतु डॉ. निसवाडे यांनी हजेरी सक्तीची असल्याचे सांगितले.  

मेडिकलचा बाह्यरुग्ण विभाग रोज सकाळी ८ वाजता सुरू होतो. मात्र, वरिष्ठांसह अनेक डॉक्‍टर आठच्या ठोक्‍याला येत नाही. काही विभाग प्रमुखांचा तर सकाळी अकरापूर्वी प्रवेश होत नाही. वारंवार होणाऱ्या तक्रारींवर पुराव्यांअभावी कारवाई करणे दुरापास्त झाले आहे. 

याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) वरिष्ठ डॉक्‍टरांना बायोमेट्रिक प्रणाली लागू केली. २४ तास सेवेचा निवासी डॉक्‍टरांचा दावा असेल तर त्यांनी बायोमेट्रिकला विरोध करण्याचे कारण नाही. विद्यार्थी असल्याने हजेरीला विरोध असू नये, अशी प्रतिक्रिया विभागप्रमुखांनी नोंदविली. 

लोढा समितीचे निर्देश - डॉ. निसवाडे
निवासी डॉक्‍टरांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा नियम वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आला. विशेष असे की, या शिफारशी लोढा समितीने दिल्या आहेत. यामुळे निवासी डॉक्‍टरांनी कायद्याचे पालन करावे. न्यायालयाचा अवमान होईल, असे कृत्य त्यांनी करू नये. निवासी डॉक्‍टरांनी बायोमेट्रिकवर हजेरीसंदर्भातील निर्णय मान्य करावा की करू नये हा त्यांचा प्रश्‍न आहे. मी विभागप्रमुखांना तसे पत्र देणार आहे.

Web Title: Compulsory biometric punching