कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

नागपूर - महापालिकेच्या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये मुंबईत दोन दिवसांपासून चांगलेच घमासान सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ८० टक्के जागेचा वाद निवळला. मात्र, उर्वरित जागांसाठी कोणीच माघार घ्यायला तयार नसल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

नागपूर - महापालिकेच्या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये मुंबईत दोन दिवसांपासून चांगलेच घमासान सुरू आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ८० टक्के जागेचा वाद निवळला. मात्र, उर्वरित जागांसाठी कोणीच माघार घ्यायला तयार नसल्याने कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक दोन दिवसांपासून मुंबई येथे सुरू आहे. विधानसभानिहाय तिकीट वाटप केले जात आहे. याकरिता माजी आमदार तसेच विधानसभा निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. असे असले तरी नव्याने केलेल्या रचनेत अनेक प्रभाग एकमेकांच्या विधानसभा मतदारसंघात घुसले आहेत. याशिवाय नेत्यांच्या गटबाजीमुळे काही उमेदवारांच्या जागांवर एकमत झालेले नाही. पश्‍चिम, दक्षिण-पश्‍चिम, उत्तर आणि पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघातील वाद जवळपास निवळला आहे. मात्र, उत्तर आणि दक्षिणमधील काही उमेदवारांच्या नावावर वाद सुरू आहे. विशेष म्हणजे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि नितीन  राऊत आज बैठकीला उपस्थित होते.

प्रभाग ३८ वरून खडाजंगी  
शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे आणि प्रदेश महासचिव प्रफुल्ल गुडधे यांची ३८ क्रमांकाच्या एकाच प्रभागावर दावा केल्याने बैठकीत चांगलाच वाद निर्माण झाला. शेवटी दोघांवरच याचा निर्णय सोपविण्यात आल्याचे समजते. या वादात आजवर कोणी पक्षासाठी किती योगदान दिले, किती आंदोलने केली याचीही चर्चा झाल्याचे समजते. 

भाजपची रात्रभर खलबते
भाजपची यादी जवळपास निश्‍चित झाली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांची हिरवी झेंडी त्यास मिळालेली नाही. दोन्ही नेते रात्री उशिरा बैठकीला उपस्थित राहणार होते. उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये बुधवारी रात्रभर खलबते सुरू होती. आजच नावे जाहीर केल्यास काही बंडखोरी करण्याची शक्‍यता असल्याने भाजपही शुक्रवारीच नावे जाहीर करणार असल्याचे समजते.

Web Title: confussion in municipal election seat distribution