समृद्धी महामार्गावरून गदारोळ, विरोधकांचा सभात्याग

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 18 डिसेंबर 2016

नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले असतानाच या प्रकरणाचे तीव्र पडसाद शनिवारी विधान परिषदेतही उमटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत जाधव, कॉंग्रेसचे नारायण राणे आणि संजय दत्त यांनी सरकारला घेरले असता विधान परिषदेत प्रचंड गदारोळ उडाला आणि विरोधकांनी सभात्याग केला.

नागपूर - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील बड्या आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेकडो हेक्‍टर जमीनप्रकरणातील आर्थिक स्त्रोतांची चौकशी केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले असतानाच या प्रकरणाचे तीव्र पडसाद शनिवारी विधान परिषदेतही उमटले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत जाधव, कॉंग्रेसचे नारायण राणे आणि संजय दत्त यांनी सरकारला घेरले असता विधान परिषदेत प्रचंड गदारोळ उडाला आणि विरोधकांनी सभात्याग केला.

"सकाळ'ने यासंदर्भातील वृत्त बुधवारी (ता. 14) प्रसिद्ध केले होते. याप्रकरणी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या महामार्गासाठी ठाणे, नगर, अमरावती आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये जमीन संपादित करण्यात येणार आहे. बाधित शेतकऱ्यांना जमिनींच्या बदल्यात आर्थिक मोबदल्यासोबत विकसित भूखंड दिले जाणार आहेत.

त्यामुळे कोणी जमिनी खरेदी केल्या असतील तर त्यांना त्याचे लाभ मिळणार नाहीत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांकडून या जमिनींची खरेदी झाली असेल तर कोणत्या पैशांतून ही खरेदी झाली याचे स्त्रोत तपासले जातील आणि त्याची चौकशी केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते.

त्यानंतर विधिमंडळाच्या अधिवेशनात आठवडाभर हे प्रकरण गाजत असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंतराव जाधव यांनी विधान परिषदेत ही लक्षवेधी सूचना मांडली. या वेळी ते म्हणाले, ""या समृद्धी महामार्गावरील रस्ते आणि मेगासिटीशेजारी राज्यातील आजी-माजी सनदी अधिकाऱ्यांनी शेकडो हेक्‍टर जमिनींची खरेदी केली आहे. तसेच या जमिनी महामार्गाला परवानगी मिळण्यापूर्वीच झाल्या आहेत. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यांमधील या जमिनी सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्वतःसह नातेवाइकांच्या नावावर खरेदी केल्या आहेत. उच्चपदस्थ तसेच काही माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्वतःच्या मुलांच्या नावाने या जमिनी खरेदी केल्या आहेत.'' या वेळी त्यांनी सर्व अधिकाऱ्यांची आणि त्यांच्या नातेवाइकांची नावेही सभागृहात वाचून दाखवली. तसेच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची मागणी जाधव यांनी केली.

संजय दत्त यांनीदेखील हा समृद्धी महामार्ग जनतेसाठी आहे की अधिकाऱ्यांसाठी असा सवाल केला. यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिल्याची माहिती दिली. तसेच चौकशी संदर्भातील तपशिलाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरच चौकशीचे स्वरूप जाहीर करण्यात येईल असे सांगितले. मात्र, विरोधकांनी शिंदे यांच्या उत्तरावर आक्षेप घेत सरकारविरोधी घोषणा दिल्या. जयंत जाधव यांनी त्यांच्याकडील कागदपत्रे सभागृहात भिरकावली आणि विरोधकांनी सभात्याग केला.

भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेले सरकार स्वतःच कसे भ्रष्टाचारात माखले आहे हे या प्रकरणावरून दिसून येते. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर या अधिकाऱ्यांची नावे स्पष्टपणे दिसत आहेत. म्हणजेच कुंपणच शेत खात आहे. त्यामुळे या विषयावर नुसतीच चर्चा नको. या प्रकरणाची चौकशी कोण करणार आहे. त्याचा कालावधी किती असणार आहे. चौकशीचे स्वरूप काय असणार आहे याचा तपशील सरकारने सभागृहात जाहीर करावा.
- नारायण राणे, कॉंग्रेस

Web Title: confussion on samruddhi highway