कॉंग्रेसला 'अच्छे दिन' नागपुरातून येईल - अशोक चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

नागपूर - कॉंग्रेसला नेहमीच नागपुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र व राज्यात "अच्छे दिन'च्या नावावर भाजप सत्तेत आले. या दोन्ही सरकारांनी जनविरोधी निर्णय घेऊन सामान्यांचे जिणे दुरापास्त केले. या स्थितीमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याची सुरुवात नागपुरातून होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नागपूर - कॉंग्रेसला नेहमीच नागपुरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र व राज्यात "अच्छे दिन'च्या नावावर भाजप सत्तेत आले. या दोन्ही सरकारांनी जनविरोधी निर्णय घेऊन सामान्यांचे जिणे दुरापास्त केले. या स्थितीमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्याची सुरुवात नागपुरातून होईल, असा विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.

नागपूर शहर कॉंग्रेस समितीतर्फे कॉंग्रेस पक्षाचा 131 वा स्थापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे होते. व्यासपीठावर महाराष्ट्राचे एआयसीसी प्रभारी मोहन प्रकाश, विधानसभेतील पक्षाचे उपनेते विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, नागपूर जिल्हा ग्रामीण कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्यातील भाजपच्या सरकारमुळे समाजातील सर्व घटक नाराज असल्याचे सांगून खासदार चव्हाण म्हणाले, शेतकरी, कामगार, शेतमजूर, मध्यमवर्ग, व्यापारी, उद्योजक या सरकारांच्या धोरणामुळे नाराज असून, भीतीत जगत आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असतानाही या सरकारला कोणत्याही संवेदना नाहीत. त्यामुळे आता कॉंग्रेसच्या धोरणांची जनतेला आठवण होत आहे. कॉंग्रेस पक्षाच्या धोरणामुळे देशाला विकासाचे नवे मॉडेल मिळाले होते. या धोरणांना नेस्तनाबूत करण्याचे एककलमी कार्यक्रम भाजप सरकार करीत आहे. या जनविरोधी सरकारांना खाली खेचण्याची आता वेळ आली असून याची सुरूवात नागपुरातील नागपूर महापालिका निवडणुकीपासून व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील गटबाजीचा उल्लेख करून ते म्हणाले, पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. विकास ठाकरे शहरात चांगले काम करीत आहेत. यापुढील काळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी यावेळी दिले.

मोहन प्रकाश यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर चौफेर टीका केली. नोटाबंदीचा निर्णय एखाद्या बॉम्ब हल्ल्यासारखा असल्याचे सांगून ते म्हणाले, अमेरिकेवर 9-11 झाले होते. तो हल्ला दहशतवाद्यांनी केला होता. त्याचधर्तीवर भारतात 8-11 झाले. हा आर्थिक हल्ला देशातील सत्ताधाऱ्यांनी केला. यामुळे जनता होरपळून निघत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विजय वडेट्टीवार व विलास मुत्तेमवार यांची भाषणे झाली.

Web Title: congress acche din