पाण्यासाठी कॉंग्रेस आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलाने संतापात भर घातली आहे. पाण्यावरून आज कॉंग्रेसने महापालिकेवर धडक दिली. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ्यांचा पाणउतारा करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.मागील आठवड्यापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र, उत्तर नागपूरसह अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात पाणी येत नाही.

नागपूर ः दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय प्रशासन व सत्ताधाऱ्यांना चांगलाच भोवण्याची चिन्हे आहेत. त्यात दूषित पाणीपुरवठा, काही भागात नळ कोरडे तसेच अवाजवी पाण्याच्या बिलाने संतापात भर घातली आहे. पाण्यावरून आज कॉंग्रेसने महापालिकेवर धडक दिली. संतप्त नगरसेवक, नगरसेविका, नागरिकांनी पाणी समस्येवरून अधिकाऱ्यांचा पाणउतारा करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.मागील आठवड्यापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मात्र, उत्तर नागपूरसह अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. काही भागात पाणी येत नाही. मात्र, अवाजवी पाण्याची देयके पाठवून नागरिकांना दुहेरी मनस्ताप देत असल्याचा आरोप करीत शहर कॉंग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात आज महापालिकेत जोरदार नारेबाजी, निदर्शने करण्यात आले. संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच माठ फोडत रोष व्यक्त केला. नागरिकांनी आयुक्तालयात "पाणी दो, पाणी दो, वर्ना खुर्ची खाली करो' आदी घोषणा दिल्या. यावेळी विकास ठाकरे, विशाल मुत्तेमवार, ऍड. अभिजित वंजारी, नगरसेवक रमेश पुणेकर, बंटी शेळके, संदीप सहारे, संजय महाकाळकर, मनोज सांगोळे, हरीश ग्वालवंशी, नगरसेविका उज्ज्वला बनकर, हर्षला सांबळे, साक्षी राऊत, स्नेहा निकोसे, भावना लोणारे, सरस्वती सलामे, रेखा बाराहाते, माजी नगरसेविका सुजाता कोंबाडे, माजी नगरसेवक प्रशांत धवड यांच्यासह रमण पैगवार आदींनी प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांची भेट घेऊन शहरातील पाणी समस्येवर संताप व्यक्त केला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, नगर अभियंता मनोज तालेवार, जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता श्‍वेता बॅनर्जी, ओसीडब्ल्यूचे केएनपी सिंग आदी उपस्थित होते. विकास ठाकरे यांच्यासह सर्वच नगरसेवक व नागरिकांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पाणी मागणाऱ्यांवर ओसीडब्ल्यू कंपनीकडून गुन्हे दाखल केले जात असल्याचा निषेध नोंदविला. पाण्यासाठी रोहित यादव यांच्या दाखल केलेला गुन्हा मागे घ्या, अशी मागणी यावेळी लावून धरली. नागरिकांना अवाजवी बिले पाठविण्यात येत आहे, नळाला पाणी नाही, काही भागात दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आल्याकडेही लक्ष वेधले. पाणी समस्या न सुटल्यास ओसीडब्ल्यूच्या कार्यालयांना कुलूप लावण्याचा इशारा ठाकरे यांनी दिला. नागरिकांच्या संतापामुळे अधिकाऱ्यांचेही तोंडचे पाणी पळाल्याचे चर्चेदरम्यान दिसून आले. एकाही अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देणे शक्‍य झाले नाही. यावेळी काही नागरिकांनी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. मोर्चात कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या प्रमाणात होत्या. मनपातील कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी कॉंग्रेसच्या आंदोलनातून काढता पाय घेतला. दररोज सायंकाळपर्यंत महापालिकेत दिसणारे विरोधी पक्षनेते ऐन आंदोलनादरम्यान गायब दिसून आले. त्यामुळे गटबाजी नसल्याचा कितीही दावा केला जात असला तरी तो कितपत खरा याबाबत कार्यकर्त्यांमध्ये दिवसभर चर्चा होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress aggressively for water