कॉंग्रेस-भाजपमध्ये होणार थेट सामना

राजेश चरपे
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. 

नागपूर : उमेदवारी माघारीची मुदत संपल्याने दक्षिण आणि उत्तर नागपूरचा अपवाद वगळता उर्वरित चार मतदारसंघांमध्ये प्रामुख्याने थेट लढती होणार आहेत. दक्षिणेत चौरंगी तर उत्तरेत बसपमुळे तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्‍चिमेत सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात आहेत. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसने माजी आमदार आशीष देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. येथे सर्वाधिक 20 उमेदवार रिंगणात असून, एकानेही माघार घेतलेली नाही. येथे जय जवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार अपक्ष लढत देत आहेत. याशिवाय बसपचे विनायक हाडके आणि वंचित बहुजन आघाडीचे रवी शेंडे हेसुद्धा रिंगणात असले, तरी फडणवीस विरुद्ध देशमुख असाच थेट सामना होणार आहे. 
दक्षिण नागपुरात एकूण 17 उमेदवार आहेत. यापैकी मोहन मते (भाजप), गिरीश पांडव (कॉंग्रेस), प्रमोद मानमोडे (अपक्ष), शिवसेना बंडखोर किशोर कुमेरिया, भाजप बंडखोर सतीश होले, वंचित आघाडीचे रमेश पिसे हे प्रमुख उमेदवार येथे लढत देत आहेत. यामुळे येथे चौरंगी लढत बघायला मिळणार आहे. पूर्व नागपूरमधून आमदार कृष्णा खोपडे तिसऱ्यांदा येथून निवडणूक लढत आहेत. यंदा येथून कॉंग्रेसने नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांना उमेदवारी दिली आहे. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे त्यांना पाठबळ आहे. दुनेश्‍वर पेठे आणि आभा पांडे यांनी माघार घेतली आहे. सागर लोखंडे (बसप), मंगलमूर्ती सोनकुसरे वंचित आघाडीच्या उमेदवारांसह फक्त सात उमेदवार येथे रिंगणात असले तरी थेट लढत होईल असेच चित्र आहे. 
मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 13 उमेदवार लढतीत आहेत. कॉंग्रेसचे बंडखोर रमेश पुणेकर यांनी माघार घेतल्याने भाजपचे उमेदवार आमदार विकास कुंभारे यांनाच ते फायदेशीर ठरणार असल्याचे दिसते. हलबा समाजाचे यामुळे विभाजन टळणार आहे. कॉंग्रेसने बंटी शेळके यांना उमेदवारी दिली आहे. मुस्लिमांना एकही जागा दिली नसल्याने समाज कॉंग्रेसवर नाराज आहे. त्यांनी शेळकेंना साथ दिल्यास येथे चुरशीची लढत बघायला मिळेल. येथे अर्धा डझन हलबा समाजाचे उमेदवार शड्डू ठोकून आहेत. यात प्रामुख्याने कमलेश भगतकर यांचा उल्लेख करावा लागेल. 
पश्‍चिम नागपूरमध्ये एकूण 12 उमेदवार लढत देत आहेत. मात्र, खरी लढत आमदार व भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख आणि कॉंग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यातच आहे. येथील वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला असून, बसपतर्फे संदीप मेश्राम लढतीत आहेत. 
उत्तर नागपूरमधून एकूण 14 उमेदवार लढत देत असून, भाजपचे उमेदवार आमदार डॉ. मिलिंद माने, कॉंग्रेसचे उमेदवार माजी मंत्री नितीन राऊत तसेच बसपचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे अशी तिहेरी लढत येथे बघायला मिळणार आहे. कॉंग्रेसचे बंडखोर मनोज सांगोळेंनी माघार घेतल्याने राऊत यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या मतदारसंघात बसपची मोठी व्होट बॅंक आहे. प्रदेशाध्यक्षच लढत असल्याने पुन्हा एकदा येथे तिरंगी लढत होणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress, bjp