लोकसभेसाठी काँग्रेसचे ‘दलित कार्ड’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

नागपूर - देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात देशातील ७० लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

नागपूर - देशातील दलित मतदाराला पुन्हा सोबत आणण्यासाठी काँग्रेसने विशेष अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानात देशातील ७० लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 

देशातील दलित मतदार हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार मानला जात होता. परंतु, गेल्या वीस वर्षांत हा मतदार दूर जाऊ लागला. याचा सर्वाधिक फटका उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांमध्ये बसला आहे. या मतदाराला पुन्हा काँग्रेससोबत जोडण्यासाठी अनुसूचित जातींसाठी राखीव असलेले तसेच ज्या मतदारसंघांमध्ये २० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक दलित मतदार आहे त्या देशातील निवडक ७० राखीव मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाची जबाबदारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अ. भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत यांच्यावर सोपविली आहे. 

म्हणून अभियान
या संदर्भात नितीन राऊत म्हणाले, दलित हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. काही कारणांमुळे हा मतदार दुरावला होता. परंतु, पुन्हा काँग्रेसच्या विचाराशी हा मतदार जुळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी राहुल गांधी यांच्या निर्देशानुसार राखीव मतदारसंघांमध्ये हे नेतृत्व विकास अभियान राबविण्यात येत आहे. गेल्या महिन्यात राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता देशातील ७० राखीव मतदारसंघामध्ये हा प्रयोग केला जाणार आहे.

काँग्रेसच्या योगदानावर चर्चा
या अभियानात ‘संविधान से स्वाभिमान’, ‘संविधान पे चर्चा’ याशिवाय दलितांच्या विकासासाठी काँग्रेसच्या योगदानाची माहिती दिली जाणार आहे. संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू व इतर मान्यवर नेत्यांच्या भाषणांच्या व्हीडीओ टेप दाखविण्यात येतील. जवळपास ९० दिवसांचा हा कार्यक्रम असल्याचे राऊत यांनी सांगितले. या अभियानातून उत्तर प्रदेशवर अधिक लक्ष दिले जाणार आहे. उत्तर प्रदेशात मायावती यांच्या बसपाला आम्ही पूर्ण ताकदीनिशी उत्तर देऊ, असा दावा राऊत यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Dalit Card for Loksabha Election Politics