Maharashtra Vidhansabha 2019 : मेळघाटात कॉंग्रेसच्या माजी आमदाराला राष्ट्रवादीचे तिकीट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

अमरावती : आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या मेळघाटातील राजकारणात नवा ट्विस्ट आला असून कॉंग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे तिकीट कापून प्रशासकीय अधिकारी रमेश मावस्कर यांना संधी दिली आहे.

अमरावती : आदिवासीबहुल मतदारसंघ असलेल्या मेळघाटातील राजकारणात नवा ट्विस्ट आला असून कॉंग्रेसचे माजी आमदार केवलराम काळे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे भाजपने विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे तिकीट कापून प्रशासकीय अधिकारी रमेश मावस्कर यांना संधी दिली आहे.
मेळघाट हा मतदारसंघ पूर्वी कॉंग्रेसकडे होता. 2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या केवलराम काळे यांनी तेव्हाचे भाजपचे उमेदवार व माजी आमदार राजकुमार पटेल यांचा पराभव केला. विशेष म्हणजे श्री. काळे यांना 63 हजार 619 तर श्री. पटेल यांना 62 हजार 909 मते मिळाली होती. केवळ 710 मतांनी राजकुमार पटेल यांचा पराभव झाला. 2014 च्या निवडणुकीतसुद्धा राजकुमार पटेल यांनी चांगलाच जोर लावला. या वेळी ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर मैदानात होते. भाजपकडून प्रभुदास भिलावेकर रिंगणात होते. या निवडणुकीतदेखील राजकुमार पटेल यांचा एक हजार 979 मतांनी पराभव झाला. कॉंग्रेसचे केवलराम काळेसुद्धा पराभूत झाले व ते तिसऱ्या क्रमांकावर होते.
भाजपचे विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांना डावलून भाजपने या वेळी विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त या पदावर कार्यरत रमेश मावस्कर यांना उमेदवारी जाहीर केली. दुसरीकडे महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक राम चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे तिकीट मागितले होते. परंतु, केवलराम काळे यांना संधी देण्यात आली.
दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत माजी आमदार राजकुमार पटेल यांनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला साथ देत नवनीत राणा यांच्यासाठी प्रचार केला. त्यामुळे श्री. पटेल भाजपमध्ये परतणार नाहीत, असे बोलले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: congress ex mla got ticket from ncp in melghat