
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांची निवड सोमवारी (ता. चार) होणार आहे. त्यासाठी दुपारी एकला बॅंकेच्या सभागृहात बैठक होईल. यापूर्वीच अध्यक्षपदावर आपली वर्णी लावण्यासाठी संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष व दोन उपाध्यक्षांच्या निवडीसाठी रविवारी (ता. तीन) महाविकास आघाडीची बैठक झाली. चर्चेच्या पहिल्या फेरीत अध्यक्षांच्या नावावर एकमत झाले नसले तरी अध्यक्षपद कॉंग्रेसला; तर शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसला उपाध्यक्षपदाचा फॉर्म्युला ठरला आहे. सोमवारी (ता. चार) सकाळी अकरा वाजता चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. त्यात नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. आज नाव निश्चित झाले नसले तरी आर्णी तालुक्याला पुन्हा एकदा झुकते माप मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांची निवड सोमवारी (ता. चार) होणार आहे. त्यासाठी दुपारी एकला बॅंकेच्या सभागृहात बैठक होईल. यापूर्वीच अध्यक्षपदावर आपली वर्णी लावण्यासाठी संचालकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मध्यवर्ती बॅंकेवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. 21 पैकी 16 संचालक आघाडीचे आहेत. असे असले तरी अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे अजूनही एका नावावर एकमत झालेले नाही. सर्वच संचालकांकडून अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावली जात असल्याने पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता होती.
अधिक वाचा - पुणे- नागपूर शिवशाहीत आढळलं संशयास्पद पार्सल; चालकानं बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
त्यामुळेच रविवार (ता. तीन) महाविकास आघाडीचे नेते, संचालकांची बैठक शहराबाहेर असलेल्या एका कंपनीच्या विश्रामगृहात झाली. बैठकीत संख्याबळानुसार कॉंग्रेसने अध्यक्षपदावर दावा केला. बॅंकेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे यावेळीही कॉंग्रेसचा अध्यक्ष राहावा, यासाठी कॉंग्रेसकडून आग्रह आहे. त्यामुळे कॉंग्रेसची मागणी मान्य करीत अध्यक्षपद कॉंग्रेसकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे दोन उपाध्यक्षापैकी एक पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे तर दुसरे पद शिवसेनेकडे जाणार आहे. बॅंकेच्या राजकारणात पुसद येथील शब्द आजपर्यंत पाळला गेला. त्यामुळे तिथून आलेले नावावर एकमत होत आले आहे.
यावेळी महाविकास आघाडीची सत्ता आली असल्याने अध्यक्षपदावरून एका गटाला एक नाव, तर दुसऱ्या गटाला दुसरे नाव चालत नसल्याचे पुन्हा एकदा आघाडीच्या बैठकीत समोर आले. पेच वाढण्याची शक्यता असल्याने आजच्या चर्चेत केवळ अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे यावर "फोकस'करण्यात आला. सोमवारी (ता.चार) महाविकास आघाडीतील नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे. याच ठिकाणी अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांच्या नावे जाहीर केले जाणार आहे. त्यामुळे आणखी काही तास अध्यक्षपदांसाठी लॉबिंग होण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेसमध्ये अध्यक्षपदाचे सर्वाधिक चार दावेदार आहेत. त्यामुळे एक नाव निश्चित झाल्यानंतर ते नाव इतर संचालकांना चालणार का? असा प्रश्न चर्चेत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सावध भूमिका घेत नावे सोमवारी निश्चित करण्याचे ठरविले आहे. बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, खासदार बाळू धानोरकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री मनोहर नाईक, ऍड. शिवाजीराव मोघे, माणिकराव ठाकरे, प्रा. वसंतराव पुरके, वामनराव कासावार, ख्वाजा बेग, विजय खडसे, शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, बाळासाहेब मांगुळकर, वसंतराव घुईखेडकर यांचेसह जिल्हा बॅंकेतील सर्व नवनिर्वाचीत संचालक उपस्थित होते.
आर्णी,महागाव,दारव्हा किंवा वणीला झुकते माप
कॉंग्रेसच्या कोट्यात असलेले जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्षपद पुन्हा एकदा आर्णी तालुक्यात जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून आरक्षित प्रवर्गातून विजयी झालेल्या महागाव तालुक्याचा पण विचार होऊ शकतो. शिवसेनेच्या कोट्यात असलेले उपाध्यक्षपद आर्णी, दारव्हा किंवा वणी तालुक्यात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे आता सोमवारी नेते कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, कुणाच्या नावावर फुली मारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना,राष्ट्रवादीला स्वीकृत सदस्य
जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्षपद ज्या पक्षाकडे राहील त्या पक्षाचा प्रतिनिधी शिखर बॅंकेवर पाठविण्याचा निर्णय झाला आहे. उर्वरित दोन पक्षाला स्वीकृत सदस्य देण्यात येणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसचा प्रतिनिधी शिखर बॅंकेवर जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातील स्वीकृत सदस्यपद पुसदकडे जाण्याची शक्यता आहे. एक स्वीकृत सदस्य शिवसेनेला मिळणार असून ते पद कोणाला जाईल याबाबत स्पष्टता झालेली नाही.
पुत्रप्रेमासाठी स्वीकृत पदावरून 'ओढताण'
कॉंग्रेसच्या काही नेत्यांना स्वीकृतपद आपल्याकडे हवे होते. तशीच भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची होती. त्यामुळेच बैठकीत स्वीकृत सदस्य पदावरून कॉंग्रेस नेते नाराज झाल्याची चर्चा आहे. दोन्ही नेत्यांनी पुत्रप्रेम डोळ्यासमोर ठेवून आग्रह धरल्याची चर्चा बैठकीनंतर समोर आली आहे.
भाजप घेणार वेळेवर भूमिका
मध्यवर्ती बॅंकेच्या अध्यक्षपदावरून कॉंग्रेसमध्ये घमासान सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही नाराजीचा सूर आहे. अशात भाजपने अजूनही जाहीर भूमिका मांडलेले नाही. आमच्याकडे संख्याबळ नाही, त्यामुळे परिस्थितीनुसार निर्णय घेऊ, एवढेच प्रतिक्रिया भाजप संचालकांच्या गोटातून येत आहे.
संपादन - अथर्व महांकाळ