Vidhan Sabha 2019 पवारांसोबत कॉंग्रेस नेत्यांची "डिनर डिप्लोमसी'

File photo
File photo

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल 15 तास यवतमाळात होते. नियोजित दौऱ्यात यवतमाळ नसतानाही पवार यांच्यासारख्या नेत्यांचा मुक्काम म्हटल्यावर अनेकांच्या नजरा यवतमाळकडे वळल्या. कॉंग्रेस व मित्रपक्षातील नेत्यांनी माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्याकडे रात्री उशिरा पवार यांची भेट घेतली. याबाबतचा तपशील गुलदस्त्यात असल्याने "डिनर डिप्लोमसी'मध्ये काय शिजले, हे कळू शकले नाही.
विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांची आघाडी असली तरी अनेक भागांत दोन्ही पक्षांतील नेत्यांचे मनोमीलन झालेले दिसत नाही. तशीच स्थिती जिल्ह्यातही आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला जिल्ह्यात महत्त्व दिले जात नसल्याची तक्रार राष्ट्रवादीची आहे. त्यामुळेच विरोधी भूमिका घेण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा राहिला आहे. तसे उघडपणे कार्यकर्त्यांनी सांगितले होते. त्यामुळेच पवारांच्या या भेटीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. या भेटीत पवार याबाबत काय भूमिका घेतात, यावर विविध चर्चांना उधाण आले होते.
रात्री नऊच्या दरम्यान शरद पवार यांचे संदीप बाजोरिया यांच्या निवासस्थानी आगमन झाले. त्यानंतर विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, कॉंग्रेसचे यवतमाळचे उमेदवार बाळासाहेब मांगूळकर, माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी दाखल झालेत. पवार यांनी यावेळी कॉंग्रेस नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत जेवण घेतले. यावेळी झालेल्या "डिनर डिप्लोमसी'मध्ये जिल्ह्यातील राजकीय समीकरण व इतर अनेक महत्त्वांच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे बाहेर आले नाहीत.
यानंतरही जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी श्री. पवार यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यात युतीमधील नेत्यांच्या नावांचाही समावेश आहे. त्यामुळे यवतमाळच्या राजकीय क्षेत्राला पवार कोणता धक्का देतात, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com