कॉंग्रेस प्रवक्‍ते खेडा म्हणतात, राज्यात पूरस्थिती, मुख्यमंत्री सत्तासंघर्षात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

नागपूर : राज्यात पूरस्थिती आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेच्या संघर्षात व्यस्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वाऱ्यावर असल्याचा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते पवन खेडा यांनी आज केला. देशावर आर्थिक संकट असल्याचे नमूद करीत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवरही तोंडसुख घेतले. 

नागपूर : राज्यात पूरस्थिती आहे. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेच्या संघर्षात व्यस्त आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी वाऱ्यावर असल्याचा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्‍ते पवन खेडा यांनी आज केला. देशावर आर्थिक संकट असल्याचे नमूद करीत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवरही तोंडसुख घेतले. 
भाजप सरकारच्या धोरणाविरुद्ध कॉंग्रेस देशभरात 15 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करीत आहेत. आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज ते नागपुरातील प्रेस क्‍लबमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी रसातळाला चाललेली अर्थव्यवस्था, इतिहासातील सर्वाधिक बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यावर काहीही बोलत नसल्याचा आरोप केला. भारतापुढे पाकिस्तानची काहीही क्षमता नाही. मात्र, या पाकिस्तानची भीती दाखवून पंतप्रधान मोदी जनतेची दिशाभूल करीत आहेत. बेरोजगारीने 72 वर्षांचे विक्रम मोडीत काढले. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यापूर्वीसारखी स्थिती देशात आणून ठेवली. गेल्या साडेपाच वर्षांत यांनी जे देशाला दिले, त्यातून जनता रडत आहे, असा टोलाही खेडा यांनी हाणला. गुंतवणुकीतही मोठी घट झाली. सामाजिक शांततेमुळे गुंतवणूक वाढते. परंतु, भाजपने सामाजिक शांततेलाच सुरुंग लावला, असा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या या धोरणाविरुद्ध कॉंग्रेस प्रत्येक शहरात आजपासून 15 नोव्हेंबरपर्यंत आंदोलन करीत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कॉंग्रेसने नेहमीच संवादातून देशाचे तसेच नागरिकांचे हित जपले. मात्र, भाजपचा वादविवादावर अधिक विश्‍वास आहे. भाजपचे राजकारणच वादविवादावर आधारित असल्याचे ते म्हणाले. भारतात व्हॉट्‌सऍपने अनेकांचे "फोन टॅप' केले. हा गुन्हाच आहे. मात्र, याबाबत केंद्रीयमंत्री काहीही उत्तर देण्यास सक्षम नाही, असेही त्यांनी एका प्रश्‍नाच्या उत्तरात सांगितले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर बोलताना त्यांनी आमदारांची खरेदी-विक्री ही भाजपची नीती आहे. ईडी, सीबीआयसोबत भाजपची युतीच आहे, असे नमूद केले. डॉ. मनमोहन सिंग यांनी यूपीएच्या काळात नागरिकांची खरेदीची क्षमता वाढविली. त्यामुळे अर्थव्यवस्था टिकून राहिली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या खरेदीची क्षमता वाढविण्याऐवजी मोठमोठ्या भांडवलदारांवर मेहरनजर दाखविली. त्यामुळे अर्थव्यवस्था ढासळल्याचे ते म्हणाले. यावेळी शहर कॉंग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, ऍड. अभिजित वंजारी उपस्थित होते. 
सेनेला समर्थनबाबत मौन 
राज्यात मुख्यमंत्रिपदाबाबत कॉंग्रेस शिवसेनेला समर्थन देणार काय? यावर मात्र त्यांनी मौन बाळगले. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यात निवडणुकीबद्दल चर्चा झाली. यावर त्यांच्यातील बैठकीचा तपशील माहीत असल्याचे नमूद करीत हात झटकले. राज्यात प्रदेश कॉंग्रेसचे नेते प्रचारासाठी सक्षम होते. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांच्या सभा भाजपच्या तुलनेत कमी होत्या, असे सांगून त्यांनी पंतप्रधान मोदींना तेवढेच काम आहे, असा टोलाही हाणला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress spokesperson Kheda says, "The situation in the state, the Chief Minister in power struggle."