कधी उभारणार संविधान स्तंभ?

Constitution-Column
Constitution-Column

नागपूर - २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित झाले. संविधानामुळे अंधारातला भारत उजेडात आला असून सारा शोषित समाज उषःकालाच्या दिशेने प्रवास करू लागला. यामुळेच उपराजधानीतील रिझर्व्ह बॅंक चौकाला आंदोलनातून ‘संविधान चौक’ असे नामकरण मिळाले. या संविधान चौकात ‘संविधान स्तंभ’ उभारण्यात येईल, अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी वर्षभरापूर्वी महापालिका मुख्यालयात संविधान फाउंडेशनला दिली होती. मात्र, संविधान चौकात स्तंभ उभारण्याचा विसर महापालिकेला पडला. महापौर जिचकार यांनी दिलेली घोषणा हवेत विरली आहे. 

संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून प्रत्येक आंबेडकरी आंदोलनाचे ‘रणशिंग’ फुंकले जाते. कामगारांच्या, शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या, डॉक्‍टरांच्या, वकिलांच्या लढ्याला याच चौकातून आंदोलनाचे बळ मिळते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे प्रेरणास्थान हा चौक बनला आहे. अंगणवाडीसेविकांचा एल्गार पुकारण्याचे हे ठिकाण बनले आहे. शेतकरी आणि शेतमजुरांचा आवाज याच चौकातून बुलंद होतो. एकूणच सर्वसामान्यांचे प्रश्‍न सरकारसमोर संवैधानिक मार्गाने मांडण्याचे अधिष्ठान म्हणजे संविधान चौक आहे. 

या हेतूने संविधान फाउंडेशनतर्फे या चौकात संविधान प्रास्ताविकेचा स्तंभ यावा, चौकाचे सौंदर्यीकरण करावे, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी येथे सोय करावी, हे चळवळीचे केंद्र असल्याने डॉ. आंबेडकर जयंती, संविधानदिन, महापरिनिर्वाणदिनाला उभारण्यात येणाऱ्या मंचासाठी महापालिकेद्वारे शुल्क आकारण्यात येऊ नये या मागण्यांचे निवेदन पुढे येताच महापौर नंदा जिचकार यांनी सर्व मागण्या वर्षभरात पूर्ण करण्याची ग्वाही बैठकीत दिली. तर स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी महापालिकेतर्फे स्तंभ उभारण्यासाठी ३० लाखांची तरतूद केली. मात्र, ही तरतूद अद्याप कागदावर आहे. स्तंभ उभारलाच गेला नाही.

आर्किटेक्‍टची नियुक्ती 
संविधान चौकात स्तंभ उभारण्यासाठी आर्किटेक्‍ट उदय गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ही नियुक्ती झाल्यानंतर कोणतेही काम पुढे सरकले नाही. तर महापौर जिचकार यांनी दिलेले सारेच आश्‍वासन फोल ठरले आहे, असे संविधान फाउंडेशनचे संस्थापक ई. झेड. खोब्रागडे म्हणाले.

संविधान चौकात स्तंभ उभारण्यासंदर्भात २०१७ मध्ये महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, नगरसेवक धर्मपाल मेश्राम यांच्यासह संविधान फाउंडेशनचे न्या. पी. पी. पाटील, शिवदास वासे, विलास सुटे, अशोक गेडाम उपस्थित होते. यावेळी ३० लाखांची तरतूद केली असून आर्किटेक्‍ट नेमण्यात आले; मात्र सारे काही  थंडबस्त्यात आहे. 
- ई. झेड. खोब्रागडे, संस्थापक, संविधान फाउंडेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com