बांधकाम विभागात ‘किस्सा कुर्सी का’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली असतानाही ते  खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या अभियंत्यास त्यांनी दोन दिवसांपासून ताटकळत ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी कार्यालयाबाहेरूनच आपले कामकाज सुरू केले.

नागपूर - सार्वजनिक बांधकाम विभागातील ‘किस्सा कुर्सी का’ चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता यांची बदली झाली असतानाही ते  खुर्ची सोडण्यास तयार नाहीत. त्यांच्या जागी नियुक्त झालेल्या अभियंत्यास त्यांनी दोन दिवसांपासून ताटकळत ठेवले आहे. त्यामुळे त्यांनी कार्यालयाबाहेरूनच आपले कामकाज सुरू केले.

प्रादेशिक विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता आर. आर. आकुजवार यांची पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ येथे बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेशही १४ नोव्हेंबरला निघाले आहेत. नागपूरमध्ये इंडियन रोड काँग्रेसचे अधिवेशन असल्याने त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले हेमंत पाटील यांना तत्काळ रुजू होण्यासही सांगण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी  पाटील पदभार स्वीकारायला नागपूरमध्ये आले. मात्र, आकुजवार पदभार देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील  यांनी स्वतःचा अधीक्षक अभियंत्याच्या कक्षातील खुर्चीवर येऊन बसले. हे कळताच आकुजवार कार्यालयात धडकले. त्यांनी पाटील यांना खुर्चीवरून उठण्यास सांगितले. यावरून दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच वाद झाला. आकुजवार ज्येष्ठ असल्याने पाटील यांनी थोडे नमते घेतले. त्यांच्या पुढ्यातच ते खुर्ची टाकून बसले. आकुजवार पदभार सोडण्यास तयार नसल्याने पाटील यांनी आपल्या कामास सुरुवात केली. 

आकुजवार २०१३पासून नागपूरमध्ये कार्यरत होते. त्यापूर्वी २००६ पासून त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार होता. विक्षिप्त वागणूक व कारभारामुळे विभागातीलच सर्व  सहकारी,  कंत्राटादारांनाही त्यांनी त्रास दिला. त्यांच्या कार्यकाळातील न्यायालयाच्या ॲपेक्‍स इमारतीचा निविदा घोटाळा गाजला होता. आपल्याच सेवानिवृत्त झालेल्या सहकाऱ्यांचे सेवानिवृत्ती वेतनही रोखून ठेवले होते. अनेक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मुख्यमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाकडे  तक्रारी केल्या होत्या. कुठलाच अधिकारी आपल्या विभागात कोणी घेण्यास तयार नसल्याचे त्यांचे आजवर चांगलेच फावले होते. दरम्यान, सायंकाळी उशिरा आकुजवार यांनी पदभार सोपविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आकुजवार यांची बदली झाली आहे. ते खुर्ची सोडत नसल्याचे आपल्या कानावर आले आहे. मात्र, आता त्यांना  स्वाक्षरी करण्याचा किंवा विभागाचे कामकाज व निर्णयात सहभागी होण्याचा अधिकार राहिला नाही. त्यांना बदली झालेल्या जागेवरच जावेच लागणार आहे.
- संदीप पाटील, मुख्य अभियंता, विद्युत, मुंबई

Web Title: Construction Department Chair Issue