Video : या कारणासाठी चंद्रपुरातील बांधकाम मजूर झाले संतप्त...वाचा

नीलेश झाडे
Saturday, 2 May 2020

चंद्रपूर-बल्लारपूर वळण मार्गावर या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येथील बांधकाम गेल्या दीड महिन्यापासून बंद पडले. काम नाही, मजुरी नाही, रेशन नाही यापेक्षा गावाकडे कुटुंबासोबत राहू, असा तगादा त्यांनी लावला आहे. आज सुमारे पंधराशे बांधकाम मजूर अचानक चंद्रपूर-हैदराबाद महामार्गावर आले व त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वेस्थानक असलेल्या बल्लारपूर येथून शेकडो मजूर स्पेशल रेल्वेगाडीने बिहार, झारखंडच्या दिशेने रवाना होण्याच्या 12 तासांच्या आतच त्याचे वेगळे परिणाम दिसू लागले आहेत. या रेल्वेस्थानकापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामस्थळी कामावर असलेले मजूर अचानक महामार्गावर येऊन आंदोलन करू लागले. त्यामुळे प्रशासनाची गोची झाली आहे.

 

पंधराशे बांधकाम मजूर रस्त्यावर

चंद्रपूर-बल्लारपूर वळण मार्गावर या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. प्रख्यात बांधकाम कंपनी शापूरजी-पालनजी यांच्याकडे बांधकामाचे कंत्राट आहे. मात्र कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे येथील बांधकाम गेल्या दीड महिन्यापासून बंद पडले आहे. मात्र येथील मजूर वर्ग काम नसल्याने व मजुरी मिळत नसल्याने संतापला आहे. सोबतच कंपनीने आश्‍वासन दिलेले रेशनदेखील अदा झाले नसल्याने आणखी या संतापात भर पडली आहे. आज सुमारे पंधराशे बांधकाम मजूर अचानक चंद्रपूर-हैदराबाद महामार्गावर आले व त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.

कंपनीने दिली केवळ आश्वासने

घटनास्थळी तातडीने पोलिस व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोबतच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्‍टर मोरे यांनीदेखील मजुरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दीड महिन्यात कंपनीतर्फे केवळ आश्वासने दिली गेली आहेत. त्यामुळे आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला मुभा द्या, अशी मागणी या कामगारांनी केली आहे. काम नाही, मजुरी नाही, रेशन नाही यापेक्षा गावाकडे कुटुंबासोबत राहू, असा तगादा त्यांनी लावला आहे.

हेही वाचा : खरेदी केंद्रावर 32 हजार क्विंटल धान पडून, चुकारेही थकले, सांगा शेतकऱ्यांनी करावे तरी काय?

बैठकीत तोडगा निघण्याची अपेक्षा

दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या प्रतिनिधींनीसोबत बैठक घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. देश व राज्यातील मजूर लॉकडाउन झाल्या वेळी "जैसे थे' परिस्थितीत होते. मात्र लॉकडाउन-3च्या प्रारंभी मजूर स्पेशल रेल्वेगाडी धावू लागल्याने या मजुरांना आता पुढे नवा पर्याय दिसू लागला आहे. यामुळे अचानक ही परिस्थिती उद्भवली आहे. चंद्रपूरच्या रामनगर पोलिस ठाण्यात आता या सर्व कामगार व प्रशासनाची एक बैठक होऊ घातली आहे. त्यात यासंबंधी तोडगा निघण्याची अपेक्षा आहे. एवढ्या मोठ्या संख्येत कामगार अचानक रस्त्यावर आल्याने बिकट परिस्थिती उद्भवली होती. मात्र पोलिसांनी वेळीच कारवाई करीत संयमाने स्थिती हाताळली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: construction labours agitation in chandrapur