या क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक मंदी; व्यवसाय दोन वर्ष मागे!

सुगत खाडे
रविवार, 26 एप्रिल 2020

कोरोनाने बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडले आहे. या संकटानंतर नागरिक आरोग्यावर जास्त खर्च करतील. त्यासोबतच इतर खर्चला कात्री लावतील. घर खरेदीला सहसा कोणी प्राथमिक देणार नाही. परिणामी बिल्डरांचे आता होत असलेले प्रतिदिवसाचे लाखो रुपयांचे नुकसान पुढे कोट्यवधींच्या घरात जाईल. नोटंबंदीमुळे आधीच हे क्षेत्र संकटात सापडले होते. त्यानंतर आता कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम क्षेत्र दोन वर्ष मागे गेले आहे, असं मतं बांधकाम व्यावसायिकांनी‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलं आहे.

अकोला : कोरोनाने बांधकाम क्षेत्र अडचणीत सापडले आहे. या संकटानंतर नागरिक आरोग्यावर जास्त खर्च करतील. त्यासोबतच इतर खर्चला कात्री लावतील. घर खरेदीला सहसा कोणी प्राथमिक देणार नाही. परिणामी बिल्डरांचे आता होत असलेले प्रतिदिवसाचे लाखो रुपयांचे नुकसान पुढे कोट्यवधींच्या घरात जाईल. नोटंबंदीमुळे आधीच हे क्षेत्र संकटात सापडले होते. त्यानंतर आता कोरोनाच्या संकटामुळे बांधकाम क्षेत्र दोन वर्ष मागे गेले आहे, असं मतं बांधकाम व्यावसायिकांनी‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केलं आहे.

देशभर कोरोनाचे संक्रमण वाढत चालल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात आतापर्यंतची सर्वाधिक मंदी आली आहे. महामारीच्या भीतीने मजूर स्वगृही परतले आहेत. तयार प्रॉपर्टी जसे फ्लॅट, दुकान, बंगले, ड्युप्लेक्स आदींची विक्री थांबली आहे. त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्राला कोट्यवधींचे नुकसान झाल्याचा अंदाज लावला जात आहे. आधीपासूनच गर्तेत अडकलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोना व्हायरसने अधिक संकटात टाकलं आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्यवसाय कोरोना व्हायरसच्या आधीपासूनच संकटात होता. या स्थितीतून बाहेर निघण्यासाठी किमान सहा महिने लागणार असल्याचे मत बिल्डरांनी व्यक्त केले आहे. टाळेबंदीतून सुटका झाल्यानंतर सुद्धा रिअल इस्टेट क्षेत्रात उभारी येणाऱ्या शक्यता कमी असल्याने या व्यवसायात कोट्यवधी रुपये गुंतवणारे व्यावसायीक आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

दरवाढ अटळ
कोरोना संकाटतून बाहेर आल्यानंतर बांधकाम साहित्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. सिमेंट, लोहा, इलेक्ट्रॉनिकचे साहित्य, स्टाईल्स व घर बांधकामासाठी लागणाऱ्या इतर साहित्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा परिणाम घरांच्या किंमतीवर सुद्धा दिसून येईल. परिणामी फ्लॅट, दुकान, बंगले, ड्युप्लेक्सच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता बिल्डरांनी व्यक्त केले आहे.

नोटबंदीनंतर आता महामंदी
आधी केंद्र शासनाने नोटबंदी जाहीर केली होती. त्यामुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले होते. त्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी जवळपास सर्व मजूर बांधकाम साईटवरून गावाकडे अथवा अन्य शहरात परत गेले आहेत. पूर्वीच मंदीच्या सावटात असलेले रिअल इस्टेट क्षेत्र कोरोनामुळे आणखी मंदीत गेले आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक दु:खाचे दिवस या क्षेत्राला पाहावे लागत आहे. 

गृह प्रवेश व खरेदीचा मुहूर्त हुकाला
कोरोना व्हायरसच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे एक महिन्यापासून जीवनावश्यक गोष्टी वगळता सगळ्या प्रकारचे उद्योग, धंदे बंद आहेत. साहजिकच भारतातल्या प्रचंड मोठ्या रिअल इस्टेट क्षेत्रातही गोष्टी ठप्प पडल्या आहेत. त्यामुळे या वेळी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवीन वास्तू प्रवेशही लांबले आहेत. परिणामी बिल्डर्समध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा गंभीर स्थितीतून बाहेर निघण्यासाठी किमान सहा महिने लागतील. परंतु पुढील वर्षीच स्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे. 

कोट्यवधीचे नुकसान; शासनाने मदत द्यावी
टाळेबंदीमुळे बांधकाम व्यावसायिकांचे प्रत्येक दिवशी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी किमान दोन वर्षाचा कालवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या क्षेत्राला उभारी देण्यासाठी शासनाने पॅकेज जाहीर करावे. 
- पंकज कोठारी
माजी राज्य उपाध्यक्ष (क्रेडाई) व बांधकाम व्यावसायिक, अकोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona effect on real estate business two year back in akola