काय हे दुर्दैव! कोरोनाने त्यांना केले लक्ष्य तर चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला... 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 July 2020

अंजनगावसुर्जी येथील 36 वर्षे वयाच्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू होते. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही खबरदारीचा उपाय म्हणून अंजनगावसुर्जीपासून जवळच असलेल्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविले होते.

अमरावती : माणसावर एकामागून एक संकट कसे ओढवते याची प्रचिती नुकतीच जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी येथे अनुभवास आली. येथील गुलजारपुरा परिसरात राहणारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, त्याच्या घराला कुलूप असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्याच्या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्याने घर फोडून 3 लाख 30 हजारांचा ऐवज लंपास केला. 

अंजनगावसुर्जी येथील 36 वर्षे वयाच्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्यावर अमरावती येथे उपचार सुरू होते. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील अन्य सदस्यांनाही खबरदारीचा उपाय म्हणून अंजनगावसुर्जीपासून जवळच असलेल्या एका क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठविले होते. त्यामुळे त्यांच्या घरात कोणीही सदस्य नसल्याने घराला कुलूप लावलेले होते.

अवश्य वाचा- ताई थांब जाऊ नको.... स्वराजची शेवटची आर्त हाक 

उपचारानंतर अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर काही दिवसांनी संबंधित व्यक्ती बरा होऊन पुन्हा अंजनगावसुर्जी येथील गुलजारपुऱ्यातील आपल्या घरी पोहोचला. तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनात आले. यात त्या व्यक्तीच्या पत्नीची 33 ग्रॅमची सोन्याची पोत, मुलाच्या सोन्याच्या 11 ग्रॅमच्या अंगठ्या व चांदीच्या अंगठ्या या दागिन्यांसह 1 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण 3 लाख 30 हजारांचा ऐवज चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. 

अवश्य पहा-  Video : `बसंती`साठी विरू चढला टॉवरवर....

घरी कुणीच नसल्याचे बघून चोरांनी घरात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यांनी प्रत्येक खोलीतील सामग्री अस्ताव्यस्त केल्याचे दिसून आले. त्या व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona infected a man while the thieves ransacked his locked house ...