बापरे! गोंदियात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी आढळले ६० बाधित रुण

मुनेश्वर कुकडे
रविवार, 2 ऑगस्ट 2020

रविवारी आढळून आलेल्या 60 रुग्णांपैकी सर्वाधिक 38 रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे रविवारी गोंदिया येथील प्रयगशालेतच्या अहवालावरून स्पष्ट झाले. कोरोनाचा वाढता वेग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

गोंदिया : मागील काही दिवसांपूर्वी कोरोनामुक्तीच्या वाटेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्यात अलीकडे काही दिवसात बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने जिल्हा कोरोना विस्फोटाकडे जात आहे. रविवारी (ता. 2) रेकॉर्ड ब्रेक 60 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने चिंतेत भर पडली आहे.

जिल्ह्यात कोरोना क्रियाशील असलेल्या रुग्णांनी शतक गाठले असून क्रियाशील रुग्ण 146 झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे रविवारी गोंदिया येथील प्रयोगशाळेच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

आतापर्यंत 386 कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत. क्रियाशील रुग्णांची संख्या 146 झाली आहे. 230 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे.

सर्वाधिक 38 रुग्ण तिरोडा तालुक्यातील

रविवारी आढळून आलेल्या 60 रुग्णांपैकी सर्वाधिक 38 रुग्ण हे तिरोडा तालुक्यातील आहेत. अदानी पॉवर प्रोजेक्टमधील 19 कामगार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तिरोडाच्या गांधी वॉर्ड येथील एक रुग्ण, मुंडीकोटा व बेलाटी/खुर्द येथील प्रत्येकी पाच, वडेगाव, पिपरिया, गोंडमोहाडी, पांजरा, पालडोंगरी, पाटीलटोला, काचेवानी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

गोंदिया तालुक्यात रविवारी दहा रुग्ण आढळले असून चार रुग्ण हे गोंदिया शहरातील सिंधी कॉलनीतील आहेत. एक रुग्ण कुंभारेनगर, एक रुग्ण गोशाळा वॉर्डातील असून हा रुग्ण भोपाळ येथून आलेला आहे. एक रुग्ण सेजगाव येथील असून तो पंजाब येथून आलेला आहे. मुंडीपार येथे आढळून आलेला एक रुग्ण हा तेलंगणा येथून आलेला आहे. दोन रुग्ण हे मध्य प्रदेशातील बालाघाट येथून उपचारासाठी गोंदियात आलेले आहेत.
देवरी तालुक्यात चार रुग्ण आढळले असून यामध्ये परसटोला, भागी, पुराडा व देवरी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

क्रियाशील रुग्णसंख्या १४६

आमगाव तालुक्यातील चिरचाळबांध येथे दोन रुग्ण, सडक अर्जुनी तालुक्यातील हलबीटोला येथील एक रुग्ण असून तो छत्तीसगड येथून आलेला आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात पाच रुग्ण आढळले असून दोन रुग्ण हे वडेगाव येथील तर तीन रुग्ण अर्जुनी मोरगाव येथील आहेत.
रविवारी आढळून आलेल्या 60 रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 386 वर पोहोचली आहे. क्रियाशील रुग्णांची संख्या 146 झाली आहे.

जाणून घ्या : पंधरा दिवसांपासून तिची प्रकृती होती खराब, प्रशासनाने सुटीच्या अर्जाकडे केले दुर्लक्ष अन्...

आतापर्यंत 386 बाधित रुग्ण

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू प्रयोगशाळेत आजपर्यंत तपासणीसाठी एकूण 9 हजार 624 नमुने पाठविण्यात आले. यातील 9 हजार 046 नमुने निगेटिव्ह आढळले; तर 369 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. 71 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित आहे. 138 नमुन्यांच्या अहवालाबाबत अनिश्चितता कायम आहे. जिल्ह्यातील चार कोरोनाबाधित रुग्ण हे जिल्ह्याबाहेर बाधित आढळले आहे. गोंदिया येथील प्रयोगशाळेतून 369 आणि रॅपिड अँटिजेन टेस्टमधून १३ असे एकूण 386 बाधित रुग्ण आढळले आहेत.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona outbreak in Gondia; 60 affected patient found on the one day