esakal | वणवण फिरून मिळाला नाही बेड, कोरोनाबाधिताने शेवटी कारमध्येच सोडला जीव

बोलून बातमी शोधा

corona dead
वणवण फिरून मिळाला नाही बेड, रुग्णाने शेवटी कारमध्येच सोडला जीव
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. बेड न मिळाल्याने, वेळेवर उपचार न मिळाल्याने कोरोनाचे रुग्ण श्‍वास सोडत आहेत. आज अशीच एक घटना सोमवारी (ता. १९) समोर आली. तब्येत बिघडल्याने कोरोनाग्रस्त रुग्णाला घेऊन नातेवाईक चंद्रपुरातील अनेक दवाखाने फिरले. मात्र, बेड मिळाला नाही. शेवटी रुग्णाने आपल्याच कारमध्ये प्राण सोडला. प्रवीण दुर्गे (वय ४० रा. नगीनाबाग चंद्रपूर) असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा: आजपासून दुपारी १ वाजेनंतर दुकाने, बाजारपेठा बंद; फक्त मेडिकल्स राहतील सुरू

नगीनाबाग येथील प्रवीण दुर्गे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे नातेवाईकांनी धावपळ सुरू केली. प्रवीण दुर्गे यांना कारमध्ये टाकून शहरातील अनेक रुग्णालयात त्यांनी बेड मिळते का याची पाहणी केली. मात्र, शहरातील एकाही रुग्णालयात बेड मिळाला नाही. शेवटी शासकीय कोविड रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. तेथे कारमध्ये घेऊन जात असतानाच शासकीय कोविड रुग्णालयाच्या परिसरातच त्यांचा कारमध्ये मृत्यू झाला. रविवारी (ता. १८) बेड न मिळाल्याने एका रुग्णाचा प्रवासी निवाऱ्यात मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दहा हजारांच्या वर पोहोचली आहे. आतापर्यंत ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन कितीही म्हणत असले तर सामान्य नागरिकांना बेड उपलब्ध होत नाही आहे ही वास्तविकता आहे. त्यामुळे बेडसाठी रुग्णांना वणवण फिरावे लागते आहे. काहींचा या सोयीअभावी मृत्यूदेखील होत आहे. रविवारी सकाळी ब्रह्मपुरी येथे बेड न मिळाल्याने एका रुग्णाने प्रवासी निवाऱ्यात अखेरचा श्वास घेतला. आज अशाच पद्धतीने एका रुग्णाला जीव गमवावा लागला.