ह्रदयद्रावक...कोरोनाशी झुंजणाऱ्या अनेकांना दिले जीवन; पण स्वतःच हरले आयुष्याची लढाई 

दीपक फुलबांधे
Wednesday, 14 October 2020

कोरोनासोबत त्यांची सतत झुंज सुरू असताना बाहेरून ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचा सपोर्ट देण्यात आला. परंतु, शेवटी मंगळवारी डॉ. कांबळे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील आहेत. या घटनेचा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. 

भंडारा : जिल्ह्यात कोरोना आजाराचा संसर्ग सुरूच असून, ग्रामीण व शहरी भागात रोज नवीन रुग्णांची भर पडत आहे. अशावेळी आरोग्य, पोलिस व इतर विभागांतील योद्घे आपला जीव धोक्‍यात टाकून कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत. त्यापैकी एका योद्ध्याला कोरोनाचा संसर्ग झाला. महिनाभराच्या चिवट झुंजीनंतर या योद्ध्याची प्राणज्योत मालवली. सालेभाटा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र विठोबाजी कांबळे (वय 57) यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले.

डॉ. कांबळे यांचे शिक्षण बीएएमएसपर्यंत झाले असून, ते 1989 पासून आरोग्यसेवेत होते. त्यांची पहिली नियुक्ती अमरावती जिल्ह्यात झाली. त्यानंतर गोंदिया व 2015 पासून भंडारा जिल्ह्यात बदलून आले. सालेभाटा प्राथमिक आरोग्य केंद्रातील राजेगाव/ मोरगाव येथील आयुर्वेदिक दवाखान्याचे ते प्रभारी होते. डॉ. कांबळे 30 एप्रिल 2021 ला सेवानिवृत्त होणार होते. 

सविस्तर वाचा - हा स्वतःचे अपयश दुसऱ्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न; खासदार नवनीत राणांवर गंभीर आरोप 
 

लाखनी येथे कुटुंबासोबत राहताना त्यांनी आपल्या आरोग्य केंद्रातील सामान्य जनता व रुग्णांची सेवा करताना सुटी किंवा कार्यालयीन वेळेचे भान ठेवले नाही. वेळप्रसंगी रुग्णाच्या घरी जाऊन प्रकृतीविषयी विचारपूस करण्यावरही त्यांनी भर दिला होता. 

परिसरातील राजेगाव, मोरगाव, बोरगाव, निलागोंदी, केसलवाडा, सिंदीपार, मुंडीपार या गावांत आरोग्यविषयक शिबिरे व कुटुंब कल्याण शस्रक्रिया शिबिरातून उत्तम कार्य केले. डॉ. कांबळे स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये तज्ज्ञांसोबत काम करत होते.

त्यांच्या संवाद साधण्याच्या कलेमुळे रुग्णांसह सर्वच कर्मचाऱ्यांसाठी ते जवळचे झाले होते. कोरोना संकटाच्या काळात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करताना त्यांनी आपल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून 15 ऑगस्टला डॉ. राजेंद्र कांबळे गौरविण्यात आले होते. 

डॉ कांबळेंची महिनाभर झुंज

डॉ. कांबळे यांना 13 सप्टेंबरला अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी तपासणी केली. त्यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु, त्यांना अधिक संक्रमण झाल्यामुळे ऑक्‍सिजन लेव्हल कमी होत असल्याचे जाणवल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हास्तरावर रवाना करण्यात आले. चार दिवस तेथे उपचार केल्यावर त्यांना नागपूर येथे वोक्‍हार्टमध्ये दाखल करण्यात आले. कोरोनासोबत त्यांची सतत झुंज सुरू असताना बाहेरून ऑक्‍सिजन, व्हेंटिलेटरचा सपोर्ट देण्यात आला. परंतु, शेवटी मंगळवारी डॉ. कांबळे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले, वृद्ध आई-वडील आहेत. या घटनेचा त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना धक्का बसला आहे. 

संसर्गापेक्षा सावधानी महत्वाची

कोरोना संसर्गाच्या काळात लहानमोठे कोणालाही हा आजार होऊ शकतो. आरोग्य कर्मचारी व अधिकारीही स्वतः:च्या आरोग्याची काळजी घेतात. परंतु, रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे डॉ. कांबळे यांना संसर्ग झाला. याचप्रमाणे इतर सर्वसामान्यांनासुद्धा या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी मॉस्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर आणि वारंवार हात धुणे अधिक गरजेचे झाले आहे. हा आजार झाल्यावर उपचारांपेक्षा आधीच सावधानता बाळगल्यास आपण सर्व सुरक्षित राहू शकतो.

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona positive doctor dies during treatment