कोरोना : सरकार, घरात बसून आम्ही उपाशी मरणार काय, मजुरांचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या भीतीने खबरदारी म्हणून नागरिक आवश्‍यक कारणासाठीच बाहेर पडताना दिसत आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील रस्ते ओसाड झाले आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठेसह ग्रामीण भागातील आठवडी बाजारात सगळीकडे शुकशुकाट दिसत आहे. परिणामी, नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तथापि, जिल्ह्यातील बेघर व हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक कुटुंबीयांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत.

गोंदिया : कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळांना जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या आदेशाप्रमाणे सुट्टी दिली आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेतही कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे नेहमी गजबजलेली गोंदियाची बाजारपेठ आता मात्र, शांत झाल्याचे दिसत आहे.

सद्यःस्थितीत, फोन व सोशल मीडियाच्या माध्यमातून साधक-बाधक माहिती पसरविल्याची चर्चा आहे. नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण दिसत असले; तरी जिल्ह्यात कोणत्याही रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. तरीपण जिल्हा प्रशासनाकडून अनेक आदेश लागू केले आहेत. यात अत्यावश्‍यक सुविधा सोडता, सर्व दुकाने व कार्यालये बंद करण्यात आली आहेत. यासर्व परिस्थितीमुळे जिल्ह्यातील बेघर व हातावर पोट भरणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.

अवकाळी पाऊस, गारपिटीनेही माजविला हाहाकार

सध्या जिल्ह्यातील बेघर व हातावर पोट भरणाऱ्यांच्या नजरा शासनाच्या मदतीकडे लागल्या आहेत. बाजारपेठेतील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे, किराणा मालासारख्या जीवनावश्‍यक दुकानदारदेखील निवांत बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांत जिल्ह्यातील आठही तालुक्‍यांत अवकाळी पाऊस, गारपिटीने हाहाकार माजविला होता. त्यामुळे, वातावरणात आलेल्या बदलामुळे सर्दी व खोकला आजाराची लागण आहे.

जिल्ह्यात एकही रुग्ण सापडलेला नाही

अद्याप जिल्ह्यात एकही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही. तथापि, नागरिक मास्क किंवा रुमाल बांधून कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेत असल्याचे दिसत आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. यामुळेच आतापर्यंत जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. ही बाब जिल्हावासींसाठी आनंदाची जरी असली; तरी दुसरीकडे बेघर व हातावर पोट भरणारे बांधकाम मजूर, रिक्षावाले, छोटे मोठे व्यापारी, रस्त्यालगत असणारे हात गाडीवाले यांच्यासह इतरांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. सर्वांवर उपासमारीची वेळ आली आहे.

हेही वाचा : बाहेर कोरोनाची भीती अन् घरात थांबलो तर यांची कटकट...काय करावे?

सुशिक्षित बेरोजगार कामाच्या शोधात

जिल्ह्याला धानाचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. मात्र मोटे उद्योगधंदे नाहीत. जिल्ह्यातील आठही तालुक्‍यातील नागरिक शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे, सुशिक्षित बेरोजगारांना कामाच्या शोधात परजिल्ह्यात जावे लागते. सद्यःस्थितीत सगळीकडे लॉकडाऊन स्थिती पाहावयास मिळत आहे. परिणामी, शेतकरी, बांधकाम कामगार, ऑटो रिक्षावाले, बेघर, कामासाठी आलेले मजूर, रोजंदारीवर असणारे कामगार व कारागीर, हॉटेलमध्ये काम करणारे वेटर यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उपस्थित झाल्याने त्यांची डोकेदुखीदेखील वाढली आहे. दरम्यान, शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona : the question of the laborers in gondia