esakal | कोरोनाने झेंडूची लागवड घटली; पावसाने गुलाबही रुसला!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona reduced marigold cultivation

कोरोना आधी लागवड केलेल्या झेंडू फुलशेतीला आवक कमी असल्याने 'अच्छे दिन' प्राप्त झाले. पोखरी येथील फूल उत्पादक शेतकरी नामदेव ढोकणे यांना कोरोना काळात १० गुंठ्यात झेंडूचे ७० हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले. आता मात्र, पावसामुळे खराब झालेली झेंडूची उपटून टाकली. सध्या भावातही घसरण झालेली आहे.

कोरोनाने झेंडूची लागवड घटली; पावसाने गुलाबही रुसला!

sakal_logo
By
दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : कोरोनाने यंदा फुलशेतीला चांगलाच फटका बसला आहे. लॉकडाउनच्या काळात पुण्यावरून झेंडूचे बियाणे, रोपे मिळू न शकल्याने पुसद तालुक्‍यातील झेंडू फुलशेतीचे क्षेत्र घटले आहे. शिवाय कोरोनामुळे लग्नसमारंभ, सणोत्सव, मंगल कार्यक्रमांवर बंदी असल्याने फुलांची मागणी घटली. येत्या दसरा-दिवाळीला झेंडूचा मुबलक पुरवठा होण्याची चिन्हे नाहीत. शिवाय निरंतर पावसाची गुलाब शेतीला चांगली झळ बसली आहे.

तालुक्‍यातील नगदी पिके सोडली, तर काही प्रमाणात शेतकरी फुलशेतीतून पैसा पदरात पाडून घेतात. मात्र, कोरोनामुळे फुलशेतीच्या व्यवसायात घसरण झाली आहे. लॉकडाउनमध्ये फुलांना उठाव नव्हता. त्यामुळे आकर्षक व सुवासिक फुलांची माती झाली. फूल उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

जाणून घ्या - हृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा

याच काळात झेंडूची रोपे व बियाणे मिळू न शकल्याने दसरा व दिवाळीच्यादृष्टिने शेतकऱ्यांना नियोजन करता येऊ शकले नाही. त्यामुळे झेंडूचे लागवड क्षेत्र अतिशय कमी प्रमाणात आहे. कोरानाचे सावट नवरात्र, दसरा, दिवाळी या सणोत्सवावर अजूनही कायम आहे. त्यामुळे झेंडू फुलांची आवक कमी राहील, अशास्थितीत शेतकऱ्यांना चांगले दर मिळतील, अशीही अपेक्षा आहे.

नवरात्र-दसरा-दिवाळी यादरम्यान फुलांना चांगली मागणी असते. झेंडू, अस्टर, लीली, निशिगंध, मोगरा, जरबेरा, गुलाब या फुलांचा पुष्पहार, गुलदस्ता यासाठी उपयोग होतो. पूजा-अर्चा, फुलांची सजावट याद्वारे मंगलप्रसंगी फुलांनी वातावरण मोहरून येते. मात्र, फुलांचा पर्यायाने फुलशेतीचा सुगंध कोरोनाने अधिक महिन्यात हरविला आहे.

हेही वाचा - व्हॉट्सॲप ग्रुपवर कमेंट करणे जीवावर बेतले; घरात घुसून युवकाचा खून

असे असले तरी कोरोना आधी लागवड केलेल्या झेंडू फुलशेतीला आवक कमी असल्याने 'अच्छे दिन' प्राप्त झाले. पोखरी येथील फूल उत्पादक शेतकरी नामदेव ढोकणे यांना कोरोना काळात १० गुंठ्यात झेंडूचे ७० हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले. आता मात्र, पावसामुळे खराब झालेली झेंडूची उपटून टाकली. सध्या भावातही घसरण झालेली आहे.

जिल्ह्यातील अग्रगण्य फूल उत्पादक शेतकरी प्रेमदास मधुकर आरेकर यांनीही कोरोनामुळे फुलशेतीला चांगलाच दणका बसल्याचे सांगितले. आधी लॉकडाउन व आता जास्त पावसामुळे फुलशेतीला खऱ्याअर्थाने बहर आलेला नाही. मात्र, गणपती उत्सवाला झेंडूचे सोने झाले, असे ते म्हणाले. खोपडी येथील त्यांच्या गुलाब शेतीलाही अतिपावसामुळे फटका बसला आहे. त्यामुळे फुल शेतीच्याबाबतीत 'कही खुशी, कही गम' अशी एकूणच परिस्थिती आहे.

अधिक माहितीसाठी - नात्याला काळीमा फासणारी घटना, आपल्याच नातीवर अत्याचार करून आजोबाची आत्महत्या

बाहेरच्या पुरवठ्यावर अवलंबून
जिल्ह्यात झेंडू फुलांची लागवड फारशी नाही. लॉकडाउन व पावसामुळे ही परिस्थिती उद्‌भवली आहे. त्यामुळे दसरा, दिवाळी या सणांसाठी झेंडू फुलांची आवक कमी राहील. परंतु, झेंडूचा पुरवठा हिंगोली, वाशीम, रिसोड या भागांतून मोठ्या प्रमाणावर होत असल्याने झेंडूचे भाव या बाहेरच्या पुरवठ्यावर अवलंबून राहणार आहे.
- प्रेमदास आरेकर,
फूल उत्पादक शेतकरी, खोपडी

नवीन लागवड नाही
लॉकडाउनमुळे पुणे येथून झेंडूचे बियाणे मिळू शकले नाही. नवीन लागवड नाही. काहीप्रमाणात अष्टर व लीली लागवड केलेली आहे. कोरोनामुळे फुलशेतीतील हमखास उत्पादन बुडाले आहे. संकटे आली तरी फुलांनीच मला तारले आहे, त्यामुळे यापुढेही फुल शेतीकडेच लक्ष राहणार आहे.
- नामदेव ढोकणे,
फूल उत्पादक शेतकरी, पोखरी

ठळक बातमी - मृत्यू झाल्यानंतर या धर्मात चक्क गिधाडांच्या स्वाधीन केला जातो मृतदेह; अनोख्या पद्धतीने करता अंत्यसंस्कार

फुलशेतीने मनाला साद घातली
वरुडच्या शेतात झेंडूची अर्धाएकरात लागवड केली आहे. सध्या झेंडू फुलल्याने शेतातील वातावरण मोहक बनले आहे. बाजारपेठेतील आवकेवर झेंडूला किती भाव मिळणार, हे ठरणार असल्याने फारशा अपेक्षा नाहीत. सध्यातरी पिवळ्याधम्म झेंडूच्या फुलशेतीने मनाला साद घातली आहे.
- दीपक आसेगावकर,
कृषिभूषण शेतकरी, पुसद

संपादन - नीलेश डाखोरे